आठवडाभरात खड्डे बुजवा; अन्यथा कारवाई : मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 08:16 PM2019-09-24T20:16:48+5:302019-09-24T20:24:45+5:30

शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला.

Fill Pits in a week ; Otherwise action: Warning of Municipal Commissioner | आठवडाभरात खड्डे बुजवा; अन्यथा कारवाई : मनपा आयुक्तांचा इशारा

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भात आयोजित बैठकीला उपस्थित महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे व अधिकारी.

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणारप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानपालिका हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही मनपाचीच आहे. खड्डे पडले की ते तातडीने बुजविणे हे यंत्रणेचे काम आहे. जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. या कर्तव्यात कुठलीही कसूर खपवून घेणार नाही. शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तअभिजित बांगर यांनी दिला.
शहरातील रस्त्यावरील खड्ड्यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आयुक्तांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीला अभिजित बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अरविंद बाराहाते, नरेश बोरकर, आसाराम बोदिले, विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांच्यासह सर्व झोनचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
खड्ड्यांचे गांभीर्य विचारात घेता अभिजित बांगर म्हणाले, खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. कुठल्याही रस्त्यांवर खड्डे पडणे आणि ते वेळीच न बुजविणे हे यंत्रणेचे अपयश आहे. पावसाळ्यात रस्त्यांत खड्डे पडूच नये, याची काळजी का घेतली जात नाही, असा सवाल करीत आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पुढील सात दिवसात सर्व खड्डे बुजवून तो अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.
खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेडे पुरेशी यंत्रणा आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांचे कामे हाती घेण्याआधी किंवा अन्य कुठलेही नवे काम सुरू करण्याअगोदर जे रस्ते आहेत, त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्राधान्य द्या. मनपाच्या हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून पुढील सात दिवसात खड्डे बुजविणे शक्य नसेल तर नासुप्रच्या हॉट मिक्स प्लान्टची मदत घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. दिलेल्या मुदतीच्या आत हे काम झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
भांडेवाडी येथेही पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावरही पुनर्भरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर संबंधित विभागांना आपण पत्र पाठविले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. रस्ते खोदल्यानंतर त्याचे पुनर्भरण योग्य होत नसेल तर त्यांना नोटीस देणे आणि ते करून घेण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. त्यामुळे स्वत: अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. आधीचे काम पूर्ण झाल्याशिवाय किंवा योग्य पुनर्भरण झाल्याशिवाय नव्याने खड्डे खोदण्याची परवानगी देऊ नये, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

विकासकामुळेही खड्डे
बैठकीत उपस्थिती अधिकाऱ्यांनी अन्य विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची माहिती आयुक्तांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या गोरेवाडा लगतच्या रिंगरोडवर, मेट्रोचे कार्य सुरू असलेला वर्धा रोड, कामठी रोड आणि सेंट्रल एव्हेन्यू रोड तसेच वीज कंपनीचे कार्य सुरू असलेल्या सेंट्रल एव्हेन्यू रोड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्य सुरू असलेल्या पारडी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची माहिती देण्यात आली.

 

 

Web Title: Fill Pits in a week ; Otherwise action: Warning of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.