'तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो' अशी थाप मारून तरुणीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:08 PM2021-03-01T13:08:07+5:302021-03-01T13:09:30+5:30

Nagpur News जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो. तुला ५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी थाप मारून एका अल्पवयीन मुलीला वारंवार नको ती मागणी करणाऱ्या एका तांत्रिकासह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

Exploitation of a young woman by slapping her saying 'I can rain notes on you' | 'तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो' अशी थाप मारून तरुणीचे शोषण

'तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो' अशी थाप मारून तरुणीचे शोषण

googlenewsNext
ठळक मुद्दे५० कोटी रुपये देण्याचे आमिषमांत्रिकासह पाच जण जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो. तुला ५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी थाप मारून एका अल्पवयीन मुलीला वारंवार नको ती मागणी करणाऱ्या एका तांत्रिकासह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. डीआर ऊर्फ सोपान हरिभाऊ कुमरे (वय ३५), विक्की गणेश खापरे (वय २०, रा. वृंदावननगर), विनोद जयराम मसराम (वय ४२, रा. चिमूर, जि. चंद्रपूर), दिनेश महादेव निखारे (वय २५) आणि रामकृष्ण दादाजी म्हसकर (वय ४१, रा. समुद्रपूर, जि. वर्धा) अशी आरोपींची नावे असून, डीआर ऊर्फ सोपान कुमरे या टोळीचा सूत्रधार आहे. तो मांत्रिक असून स्वत:च्या अंगात देवी महाकाली येतो, असे तो सांगतो.

तक्रारदार मुलगी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून आरोपी विक्कीच्या संपर्कात आली. त्याने तुला जादूटोण्याच्या तीन स्टेप शिकाव्या लागतील. त्यानंतर तुझ्यावर नोटांचा पाऊस पडेल, तुला ५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी बतावणी केली. त्यासाठी तुला जादूटोणा शिकविणारा डीआर याच्या संपर्कात यावे लागेल. आधी तुला त्याचे काम करावे लागेल नंतर तुझे काम होईल, असेही भामट्या विक्कीने सांगितले. तंत्रमंत्र साधनेसाठी कुवाऱ्या मुली हव्या असतात. वजन ५० किलो, उंची पांच फूट हवे. तुला तुझे नाव आणि पाच फोटो तसेच तुला मंथली पिरियेड कधी येतात, ते लिहून व्हॉटस्‌‌ॲपवर पाठवावे लागेल, असे विक्की म्हणाला. नंतर तो फारच आक्रमक झाला. ५० कोटी रुपये मिळतील असे सांगून वारंवार फोन करून लज्जास्पद गोष्टी करू लागला. त्याने दडपण वाढविल्याने मुलीला संशय आला. तिने आपल्या मैत्रिणींशी चर्चा केल्यानंतर थेट गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांची भेट घेतली. तिची कैफियत ऐकून घेतल्यानंतर राजमाने यांनी या प्रकरणात कारवाईची जबाबदारी एसएसबीचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्याकडे सोपविली.

तपासाची चक्रे फिरली

पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरविली. मुलीने या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी चर्चा करू म्हणत विक्कीला घरी बोलवून घेतले. शनिवारी दुपारी तो घरी पोहचताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने मांत्रिक डीआर आणि साथीदारांचे नाव व पत्ता सांगितला. त्यांना फोनही केले. त्यानुसार, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुसक्या बांधल्या.

शेतात आहे दरबार

भामट्या डीआर ऊर्फ सोपान कुमरेने गिरडजवळच्या एका शेतात आपला दरबार थाटला आहे. त्याच्या कथनानुसार, त्याची एक महिला तांत्रिक गुरू होती. तिच्याकडून तो तंत्रमंत्र शिकला. त्याने त्याआधारे एका युवतीला २७ लाख रुपये दिल्याचीही थाप मारली. पोलिसांच्या दंड्यांपुढे त्याचे तंत्रमंत्र फेल पडले.

अनेकींचे लैंगिक शोषण

आरोपी डीआर आणि त्याच्या साथीदारांनी अशाप्रकारे अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले असावे, असा संशय आहे. पोलीस या टोळीकडून त्यांच्या पापाचा हिशेब घेत आहेत. या टोळीच्या आमिषाला बळी पडलेल्या महिला-मुलींनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

----

Web Title: Exploitation of a young woman by slapping her saying 'I can rain notes on you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.