तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 02:11 PM2022-01-23T14:11:54+5:302022-01-23T14:24:17+5:30

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

Every year thousands of birds lose their lives due to garbage and nets in the lake | तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

googlenewsNext
ठळक मुद्देपरदेशी पक्ष्यांसाठी घातक : तलावावरील प्लास्टिक कचरा, जाळे धोकादायक

नागपूर : हिवाळ्याचा काळ हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा असताे. बहुतेक प्रजातीच्या पक्ष्यांचा हा प्रजननाचा काळ असताे. त्यामुळे बरेचसे पक्षी पानथळ जमीन किंवा तलावांकडे वळत असतात. मात्र, सध्या तलावावरील अव्यवस्था या पक्ष्यांसाठी धाेकादायक ठरली आहे. तलाव काठावर असलेला प्लास्टिकचा कचरा आणि मासेमारी करणाऱ्यांचे अस्ताव्यस्त पसरलेले जाळे पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

पक्षी अभ्यासकांनी जिल्ह्यातील तलावांवर केलेल्या निरीक्षणानुसार हे भीषण वास्तव मांडले आहे. थंडीचा काळ असल्याने माेठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी विदर्भाकडे पाेहोचले आहेत. अनेक प्रजातींच्या असंख्य पक्ष्यांचा मुक्काम सध्या तलाव परिसर व पानथळ जमिनीवर दिसून येत आहे. यामुळे हा परिसर निरनिराळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने फुलला आहे. मात्र, तलाव परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा आणि मत्स्यजाळे पक्ष्यांच्या जिवावर उठले आहेत.

नागपूर जिल्ह्यात २५० च्यावर तलाव आहेत आणि या बहुतेक तलावांवर मासेमारी केली जाते. पाणथळ भागात पाेषण करणारे पक्षी तलावातील मासे, किडे खाण्यासाठी गर्दी करीत असतात. मात्र, मासेमारी करणाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात हमखास अडकतात. अनेकदा मासे पकडल्यानंतर जाळे काठावर ठेवले जाते. तुटलेले जाळे तसेच फेकून दिले जाते. त्यात अडकून पक्ष्यांचा तडफडत जीव जाताे. दुसरीकडे प्लास्टिकचा कचरा माेठ्या प्रमाणात विखुरलेला असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देत असतात. अंडी आणि पिल्ल्यांनाही प्लास्टिकमुळे धाेका उद्भवताे. वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या तलावांचे निरीक्षण करून कचरा हटविण्यात येताे. शिवाय मासेमारी करणाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे असे तलाव पक्ष्यांसाठी सुरक्षित ठरतात. मात्र, अशा तलावांची संख्या कमी आहे. पक्षी निरीक्षकांच्या अभ्यासानुसार, केवळ नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

वनविभागाच्या अखत्यारित तलावांची देखरेख हाेते, पण इतर तलावांवर कुणाचे नियंत्रण नसते. तलावांचे नियंत्रण पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे असते. वनविभागाचा हस्तक्षेप चालत नाही. त्यामुळे या विभागांचा समन्वय असणे गरजेचे आहे. तलावाच्या काठावर जाळे पडून राहणार नाही, या अटींवर मासेमारीला परवानगी द्यायला हवी. शिवाय तलावांची नियमित स्वच्छता हाेणेही गरजेचे आहे.

- यादव तरटे पाटील, मानद वन्यजीव रक्षक.

Web Title: Every year thousands of birds lose their lives due to garbage and nets in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.