केंद्राच्या निर्देशानंतरही जनावरांचा खाद्य तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 01:25 PM2020-04-07T13:25:52+5:302020-04-07T13:30:07+5:30

केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. पशुखाद्यांचा जीवनावश्यक गोष्टीत समावेश करून आंतरराज्यीय वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

Even after the instruction of the center, shortage in the food of the animals | केंद्राच्या निर्देशानंतरही जनावरांचा खाद्य तुटवडा

केंद्राच्या निर्देशानंतरही जनावरांचा खाद्य तुटवडा

Next
ठळक मुद्देप्राण्यांचे खाद्यदर वाढलेजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूची साखळी तोडून महामारीच्या नियंत्रणासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि ती परिस्थितीची गरजही आहे. मात्र या काळात शहरातील पाळीव प्राण्यांना हाल सोसावे लागत आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश असल्याने प्राण्यांची अन्नासाठी भटकंती वाढली आहे. दुसरीकडे घरगुती पाळलेल्या प्राण्यांसाठीच्या खाद्यान्नाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे पुरवठा खंडित झाल्याने प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचे दर दुपटीने वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळात जनावरांना अन्नाचा तुटवडा भासणार नाही, यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. पशुखाद्यांचा जीवनावश्यक गोष्टीत समावेश करून आंतरराज्यीय वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. अन्नाविना प्राण्यांचा मृत्यू आणि त्यातून पुन्हा आजार पसरण्याचा धोका लक्षात घेता, मंत्रालयांतर्गत भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डातर्फे प्रत्येक जिल्हा प्रशासनाला व्हॉलेन्टीयर्सची टीम तयार करून प्राण्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नागपूर जिल्हाधिकारी यांनीही रस्त्यावर भटकंती करणाऱ्या प्राण्यांना अन्न वितरित करण्याचे आवाहन नागरिकांना केले असून, प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने सुरू करण्याचीही सूचना केली केली आहे. याशिवाय महापालिकेनेही पशुखाद्य वाहतुकीला संचारबंदीतून सूट दिली आहे आणि कुत्री, गाई आदी प्राण्यांना अन्न देणाऱ्यांना पासेस देण्यात येत आहेत. सर्व स्तरावरून निर्देश असूनही पशुखाद्याचा प्रचंड तुटवडा भासत आहे. एकीकडे परदेशातून खाद्यपदार्थांची आयात थांबली आहे. दुसरीकडे देशातही खाद्यपुरवठा खंडित झाला असल्याने शहरामध्ये प्राण्यांचे खाद्य मिळेनासे झाले आहे. व्यावसायिकांकडे स्टॉक असेलही पण दुकाने सुरू करण्यास तेही धजावत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राणी पाळणाºयांना मोठी समस्या येत आहे. काही व्यावसायिक फोन केल्यास पशुखाद्य देतात, मात्र त्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. १५०० रुपयांना मिळणारे खाद्य अडीच ते तीन हजारापर्यंत विकले जात असल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.


- प्राण्यांच्या खाद्यांचे दर खूप वाढले
शहरातील प्राणिप्रेमी स्मिता मिरे या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र चालवितात. जवळपास १५० कुत्र्यांना ते दररोज अन्न देतात. शिवाय त्यांच्या संस्थेतर्फे टीमद्वारे शहरातील विविध भागात स्वयंसेवकांमार्फत कुत्र्यांना खाद्य पुरवठा केला जाते. लॉकडाऊननंतर खाद्याचे दर दुपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. एक तर खाद्य मिळत नाही. त्यासाठी दूरवर शोधत जावे लागते. त्यांच्याकडेही स्टॉक संपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चढ्या किमतीत खरेदी करावी लागते. एखादा प्राणी असेल त्यांचे ठीक आहे, मात्र आमची अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

- महापालिकेने घेतली एनजीओची मदत
रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांना अन्नाचा तुटवडा भासू नये म्हणून महापालिकेने व्यवस्था केली आहे. त्यासाठी शहरातील एनजीओची मदत घेतल्याचे मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले. घाटे रेस्टॉरंट आणि गुरुद्वारा सेवा समितीतर्फे दररोज २०० ते ३०० किलो पोळ्या मिळत असून, एनजीओद्वारे रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांना पुरवल्या जाते. अन्न पोहचविताना पोलीस विभागाची अडचण येऊ नये म्हणून पासेसही देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचीही टीम असून एनजीओ पोहचत नसलेल्या भागात आमच्या टीमद्वारे प्राण्यांना अन्नपुरवठा होत असल्याचे डॉ. महल्ले यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Even after the instruction of the center, shortage in the food of the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न