५७ दिवसानंतरही नागपुरात पेट्रोलचे भाव ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:10 PM2020-05-22T20:10:47+5:302020-05-22T20:17:25+5:30

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांक पातळीवर गेल्याचा फायदा ग्राहकांना होत नसल्याचे दिसत आहे. पंपावर गेल्या ५७ दिवसापासून पेट्रोल ७६.७८ रुपये दरानेच विकल्या जात आहे. २५ मार्चलाही पेटोल याच दरात विकल्या गेले, हे विशेष.

Even after 57 days, petrol prices in Nagpur are 'as they were' | ५७ दिवसानंतरही नागपुरात पेट्रोलचे भाव ‘जैसे थे’

५७ दिवसानंतरही नागपुरात पेट्रोलचे भाव ‘जैसे थे’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या बदलत्या दरानुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या भावात चढउतार करण्याचा नियम पेट्रोलियम मंत्रालयाने आणला. पण मंत्रालय आपल्याच नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांक पातळीवर गेल्याचा फायदा ग्राहकांना होत नसल्याचे दिसत आहे. पंपावर गेल्या ५७ दिवसापासून पेट्रोल ७६.७८ रुपये दरानेच विकल्या जात आहे. २५ मार्चलाही पेटोल याच दरात विकल्या गेले, हे विशेष.
लॉकडाऊननंतर रेल्वे, बस आणि विमान सेवांसह मालवाहतूकही थांबली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता विक्री ३० टक्क्यांवर आली आहे. त्यानंतरही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले नाहीत. महागाई कमी करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे, पण कंपन्या त्याचा फायदा ग्राहकांना होऊ देत नाहीत. २५ मार्चला पेट्रोलचे दर ७६.७८ रुपये तर डिझेल ६६.३६ रुपये होते. डिझेलमध्ये केवळ ४० पैशांची घट झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानंतरही सरकारने अबकारी करात वाढ करून आपली तिजोरी भरली आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे.
पंप संचालकांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे बाजारात भीतीचे वातावरण असून जागतिक स्तरावर मागणीत मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ३४.३२ डॉलर प्रति बॅरल होती. ३ फेबुवारीला कच्च्या तेलाचे दर ५५ डॉलर प्रति बॅरल, २७ मार्चला ५० डॉलर, १ एप्रिलला २५ डॉलर, २० ते २८ एप्रिलपर्यंत २० डॉलर आणि ११ मे रोजी ३०.९७ डॉलर होते. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये नागपूरसह संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत ७० टक्के घट झाली आहे. मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर विक्री थोडीफार वाढली. मे महिन्यात रेड झोन जिल्ह्यांची संख्या वाढल्याने आणि मालवाहतुकीत वाढ न झाल्याने पुढेही पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता नसल्याचे पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

तारीख    पेट्रोल      डिझेल
१३ फेब्रु. ७८.०६     ६८.४३
१२ मार्च ७६.३२    ६६.३७
२२ मार्च ७५.७८  ६६.३६
२५ मार्च ७६.७८  ६६.३६
२२ मे    ७६.७८     ६६.७६

Web Title: Even after 57 days, petrol prices in Nagpur are 'as they were'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.