नागपूर शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प : एसएनडीएलचे व्हेंडर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:54 PM2019-09-06T23:54:17+5:302019-09-07T00:01:20+5:30

मुसळधार पावसादरम्यान वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या व्हेंडरतर्फे काम बंद करण्यात आल्याने शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प पडली आहे.

Electricity distribution system in Nagpur city stopped: SNDL vendor strike | नागपूर शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प : एसएनडीएलचे व्हेंडर संपावर

नागपूर शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प : एसएनडीएलचे व्हेंडर संपावर

Next
ठळक मुद्देपावसाने वाढली समस्या१०८४ तक्रारी, एकाचेही निराकरण नाही, २३ ब्रेकडाऊनही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसादरम्यान वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या व्हेंडरतर्फे काम बंद करण्यात आल्याने शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प पडली आहे. एसएनडीएलच्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तब्बल १०८४ तक्रारी शुक्रवारी दाखल झाल्या. २३ फिडर ब्रेकडाऊनमुळे ठप्प पडले. परंतु व्हेंडर संपावर होते. त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दुरुस्तीचे काम करण्यात आले. यात खूप वेळ लागला. दरम्यान व्यक्तिगत स्वरुपाच्या बहुतांश तक्रारीचे निराकरण झाले नसल्याची माहिती आहे.
एसएनडीलने काम सुरु ठेवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर महावितरणने कामकाज सांभाळण्याची तयारी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत एसएनडीएलचे व्हेंडर (ठेकेदार-एजन्सी) आपले थकीत ५० कोटी रुपये परत करण्यात मागणीसाठी शुक्रवारी संपावर गेले. ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद करून रविभवन येथे निदर्शने केली. शहरातील दोन मोठे व्हेंडर यात सहभागी झाले नसल्याने व्हेंडरच्या संपाला झटका बसला. मात्र मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा प्रभावित होऊ लागला. ग्राहकांच्या तक्रारी येऊ लगल्या. परंतु त्या अटेंड करण्यासाठी कुणीच नव्हते. सकाळी ११.४० वाजेपासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत १७ फीडर ब्रेकडाऊन झाले. यात गुलमोहरनगर, किनखेडे ले-आऊट, कमाल चौक, चिखली ले-आऊट, जुनी शुक्रवारी, बाबा फरीदनगर, रिंग रोड, कामठी रोड, आयबीएम, राजाबाक्षा, रामबाग, विश्वकर्मानगर, अजनी रेल्वे, विधानभवन, मेडिकल चौक व एस.टी.स्टँड फीडरचा समावेश होता. नंतर पुन्हा सहा ब्रेकडाऊन झाले. ग्राऊंड स्टाफ संपावर असल्याने दुसरीकडील कर्मचारी आणून दुरुस्ती करण्यात आली. १७ ब्रेकडाऊन रात्री ८ वाजेपर्यंत दुरुस्त होऊ शकले. दुसरीकडे व्यक्तिगत १०८४ तक्रारी सोडवण्यासाठी एसएनडीएलकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्या सोडवता आल्या नाही.
बॉक्स -कठीण परिस्थितीतही देत आहोत सेवा - एसएनडीएल
एसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराना यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्वीकार करीत कंपनी कठीण परिस्थितीतही सेवा देत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, नागरिकांना कुठलीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून कंपनी कमी मनुष्यबळातही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. महावितरणने व्हेंडरला काम देण्याचे आश्वासन दिले आहे. एसएनडीएलचे सर्व कर्मचारी कामावर आहेत.
महावितरणचे पॉवर ट्रान्सफार्मर फेल
समस्या केवळ एसएनडीएलच्या क्षेत्रातच निर्माण झाली असे नाही. महावितरणच्या चिंचभुवन सब स्टेशनचे पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने तेथून मनीषनगरपर्यंतचा परिसर अंधारात बुडाला. या सबस्टेशनमध्ये दोन पॉवर ट्रान्सफार्मर आहेत. परंतु यापैकी एक अनेक दिवसांपासून खराब आहे. गणेशोत्सवादरम्यान अखंडित वीज पुरवठ्याच्या देखभालीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. परंतु काँग्रेसनगर डिव्हीजनचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी याकडे लक्ष दिले नाही. परिणामी रात्री १२ वाजता एकमेव ट्रान्सफार्मरही फेल झाला. काही भागांना बॅकफीड करून वीज पुरवठा करण्यात आला. परंतु विजेचा लंपडाव रात्रभर सुरू होता. आता दोन्ही ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

Web Title: Electricity distribution system in Nagpur city stopped: SNDL vendor strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.