In the election expense Gadkari lead, Patole is second | निवडणूक खर्चात गडकरी आघाडीवर, पटोले दुसऱ्या क्रमांकावर
निवडणूक खर्चात गडकरी आघाडीवर, पटोले दुसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वाधिक खर्चिक असल्याचे बोलले जाते. नागपूर लोकसभा निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात होते. यातील २९ उमेदवारांनी निवडणूक विभागाला खर्चाची माहिती दिली आहे. यानुसार सर्व उमेदवारांनी मिळून १ कोटी ७५ लाख १७ हजारांवर खर्च केला. भाजपचे उमेदवार गडकरींनी निवडणूक विभागाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी निवडणुकीत एकूण ४४ लाख ८८ हजार ०४१ रुपये खर्च केले तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी ४४ लाख ३ हजार ५१५ रुपये खर्च केले. त्या पाठोपाठ बसपाचे मोहम्मद जमाल यांनी ३१ लाख ७५ हजार ९३४ रुपये तर वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनी २५ लाख ३९ हजार ५३६ रुपये खर्च केला आहे. बीआरएसपी अ‍ॅड. सुरेश माने यांनी १० लाख ३६ हजार ७७० रुपये खर्च केले.
रामटेकमध्ये गजभिये आघाडीवर
रामटेक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कृपल तुमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराभव केला. परंतु निवडणुकीत खर्च करण्यात मात्र गजभिये आघाडीवर राहिले. त्यांनी ३४ लाख ६१ हजार रुपये खर्च केले तर तुमाने यांनी २२ लाख ७७ हजार ३९९ रुपये खर्च केले. बसपाचे सुभाष गजभिये तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी ७ लाख ३ हजार ६२६ रुपये खर्च केले.


Web Title: In the election expense Gadkari lead, Patole is second
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.