थंडीत सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 08:30 PM2021-11-30T20:30:51+5:302021-11-30T20:32:45+5:30

Nagpur News महागाची औषधी खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळेच हिवाळ्यात सुकामेवा खा व ठणठणीत राहा, असे म्हटले जाते.

Eat dried fruits in the cold and stay cool! | थंडीत सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा !

थंडीत सुकामेवा खा अन् ठणठणीत रहा !

googlenewsNext
ठळक मुद्देमागणी वाढल्यानंतरही दर स्थिरसुकामेव्याचा आहारात समावेश करा

नागपूर : आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. या दिवसात सुकामेवा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी मूठभर सुकामेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुका यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जातो. या सर्व सुक्यामेव्याचे स्वत:चे गुणधर्म आहेत. थायरॉइड, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या आरोग्यासह कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यास मदत करते. यामुळे महागाची औषधी खाण्यापेक्षा कधीही सुकामेवा आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. त्यामुळेच हिवाळ्यात सुकामेवा खा व ठणठणीत राहा, असे म्हटले जाते.

सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंताचे खाणे समजले जाते. आर्थिकदृष्ट्या तर ते महाग आहेच; पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणे गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचा रखरखीत होते. या दिवसात त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते, तसेच स्निग्धताही कमी होते. थंडीच्या दिवसात त्वचेवर नखाने कोरले तर पांढरे ओरखडे पडतात. वास्तविक थंडीत आपल्याला घाम कमी येतो. तहानही कमी लागते. म्हणून आपण पाणी कमी पितो. त्वचेवरील स्निग्धता जपायची असेल, तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बदाम व अक्रोडचे सेवन करणे.

कमीत कमी दहा बदाम व दोन ते तीन अक्रोड दररोज खाणे चांगले. त्यातून शरीराला व्यवस्थित ओमेगा-३चे जीवनसत्त्व मिळते. बदाम व अक्रोड प्रत्येकालाच परवडत नाही. अशावेळेस मूठभर शेंगदाणे व वितभर सुक्या खोबऱ्याचा तुकडा खावा. अर्थात एखाद्याला हृदयरोगाचा त्रास किंवा रक्तदाबाचा विकार नसल्यास हा उपाय स्वस्त व मस्त आहे. डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तुपामुळे शरीरात स्निग्धता येते. खजूर, मनुका, काळा मनुका, अंजीर यामध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे आपल्याला कमी खाऊनही शक्ती मिळते. त्यामुळे थंडीत आहार उत्तम ठेवला तर मनाने व शरीराने मजबूत राहता येईल.

सुकामेवा खातोय भाव (ठोक भाव, किलो, दर्जानुसार)

काजू ६४०-८००

बदाम ५६०-६२०

पिस्ता ९००

डिंक १८०-२५०

गोडंबी ७००

अंजीर ७००-११००

अक्रोड ६००-६५०

चारोळी १२५०

थंडीत सुकामेवा का खावा?

हिवाळ्यात शरीर थंड पडते. सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात आणि ऊर्जा मिळते. या खाद्यपदार्थांतून कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात. हा ऋतूनुसार आहार आहे. यातून ओमेगा-३ फॅटी ॲसिड, झिंक मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जयश्री पेंढारकर, आहारतज्ज्ञ.

सुकामेवा खाताना ही घ्या काळजी

सुकामेवा नेहमीच नियमित समप्रमाणात खावा. नेहमीच पाण्यात भिजवून खाल्ल्यास शरीराला फायदा होतो. सुकामेवा खाताना अतिरेक करू नये. सुकामेवा दररोज थोडा थोडा खाल्ल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सुकामेव्याची पावडर करून भाजून घ्यावी. त्यामुळे शरीराला फायदा होतो.

डिंक लाडू, मेथी लाडू खायलाच हवेत

थंडीत शारीरिक श्रम कमी होतात. त्यामुळे बद्धकोष्टता वाढते. त्यामुळे डिंक लाडू किंवा मेथी लाडू खायला हवेत. वर्षभर मेथी अर्धा वा पूर्ण चमचा खावी. लाडू करून खाल्ल्यास अधिक चांगले असते. त्यामुळे शरीराला पोषक तत्त्व मिळतात. त्यात साखर घालू नये.

मागणी वाढली

हिवाळ्यात सुकामेव्याला मागणी वाढली आहे. या दिवसात बदाम सर्वाधिक विकले जातात. तसे पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमीच आहेत. सध्या काजू, बदाम, अक्रोड आणि डिंकाला मागणी वाढली आहे.

भवरलाल जैन, व्यापारी.

Web Title: Eat dried fruits in the cold and stay cool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.