नुसते बॅनर लावू नका, प्रत्यक्ष साफसफाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:09+5:302021-02-25T04:10:09+5:30

नागपूर : गांधीसागर तलाव परिसरात नुसते बॅनर लावून नागरिकांना साफसफाई कायम ठेवण्याचा उपदेश करणे पुरेसे नाही. नागरिकांवर ठोस प्रभाव ...

Don't just put up banners, do the actual cleaning | नुसते बॅनर लावू नका, प्रत्यक्ष साफसफाई करा

नुसते बॅनर लावू नका, प्रत्यक्ष साफसफाई करा

Next

नागपूर : गांधीसागर तलाव परिसरात नुसते बॅनर लावून नागरिकांना साफसफाई कायम ठेवण्याचा उपदेश करणे पुरेसे नाही. नागरिकांवर ठोस प्रभाव पडण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिसराची साफसफाई करा व त्याद्वारे नागरिकांपुढे आदर्श निर्माण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जनहित याचिकाकर्ते अ‍ॅड. पवन ढिमोले व अ‍ॅड. सारंग निघोट यांना दिला.

या दोन वकिलांनी गांधीसागर तलाव व परिसराच्या स्वच्छतेसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने प्रशासन साफसफाईकरिता त्यांच्या पद्धतीने कार्य करतेच., पण याचिकाकर्त्यांनीही या कार्यात हातभार लावायला हवा, असे मत व्यक्त करून त्यांना, नागरिकांनी साफसफाईचे नियम पाळावे याकरिता जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी गांधीसागर तलाव परिसरात साफसफाईचा संदेश देणारे बॅनर लावले व त्याची छायाचित्रे न्यायालयात सादर केली. परंतु, न्यायालयाने त्यावर असमाधान व्यक्त केले. जनजागृतीकरिता केवळ बॅनर लावून उपदेश देणे पुरेसे नाही. याचिकाकर्त्यांनी स्वत: परिसराची साफसफाई करून नागरिकांना जागृत केले पाहिजे. प्रशासनावर टीका करणे व त्यांच्या कामावर आक्षेप घेणे सोपे आहे. त्यासोबत नागरिकांनी स्वत:ही साफसफाईच्या कामात योगदान दिले तर, ५० टक्के समस्या आपोआप कमी होतील, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, याचिकाकर्त्यांना वरीलप्रमाणे आदेश देऊन येत्या दोन आठवड्यामध्ये प्रत्यक्षपणे केलेल्या कामाची माहिती सादर करण्यास सांगितले. याकरिता मनपा अधिकाऱ्यांची मदत घेता येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. दर्शन सिरास तर, मनपातर्फे ॲड. अमित कुकडे यांनी कामकाज पाहिले.

--------------

गांधीसागर विकासाकरिता टेंडर

महानगरपालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून गांधीसागर तलावाच्या विकासाकरिता टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली. या टेंडरमध्ये गांधीसागर तलावाचे बळकटीकरण, सौंदर्यीकरण, नूतनीकरण व सुधार कामाचा समावेश आहे. याशिवाय सदर परिसरात बहुउद्देशीय सभागृह, जेट्टी पूल, म्युझिकल फाऊंटेन, ४-डी शो थिएटर, फन पझल, स्टोन कम्पाऊंड वॉल, पाथवे, उद्यानाचा विकास, पॅडल बोट इत्यादी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

Web Title: Don't just put up banners, do the actual cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.