अफवांवर विश्वास ठेवू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:28 PM2020-07-30T23:28:58+5:302020-07-30T23:30:14+5:30

नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. असा लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Don't believe the rumors! | अफवांवर विश्वास ठेवू नका!

अफवांवर विश्वास ठेवू नका!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. असा लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर शहरात लॉकडाऊन घोषित करण्याचा अधिकार आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये नागपूर महापालिका आयुक्तांना आहे. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त कुणाच्याही नावाने संदेश बाहेर फिरत असेल किंवा कुणाची ऐकिव माहिती असेल तर ती केवळ अफवाच असू शकते. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
नागरिकांनी नियम पाळले तर कोरोनाचे संक्रमण होणार नाही. त्यासाठी व्यापारी, नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती सुरू आहे. दरम्यान दोन दिवसाचा जनता कर्फ्यू नागरिकांनी पाळला आणि शिस्तीचे दर्शन घडविले. हीच शिस्त यापुढे अपेक्षित आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, सम आणि विषम नियमांचे पालन दुकानदारांनी करणे, दुकानात सॅनिटायझर ठेवणे, मास्कचा वापर करणे, एका वेळी फक्त पाच ग्राहक दुकानात असणे, वाहनांसंदर्भात असलेल्या नियमांचे पालन करणे, हे सर्व दिशानिर्देश पाळणे आवश्यक आहे.

नियम पाळा अन्यथा कर्फ्यू
लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हा अंतिम पर्याय नाही. परंतु नियम पाळले नाही तर कर्फ्यू लावावा लागेल. मात्र तसे करताना कमीत कमी तीन ते चार दिवस अगोदर त्याची सूचना नागरिकांना देण्यात येईल, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

लक्षणे आढळल्यास चाचणी करा!
कोविड-१९ वर नियंत्रण मिळवायचे असेल, साखळी खंडित करायची असेल तर नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शरीरात कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मनपातर्फे आता ठिकठिकाणी चाचणी केली जात आहे. नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अ‍ॅन्टीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. तेथे नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे

Web Title: Don't believe the rumors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.