नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 10:46 AM2022-05-12T10:46:55+5:302022-05-12T11:11:44+5:30

पालकांसोबत चेन्नईवरून बसलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास बंद झाला होता. हृदयाचे ठोकेही शांत झाले होते. क्रू मेंबरने पायलटला ही माहिती दिली. पायलटने लगेच मदतीसाठी घोषणा केली.

doctor vaibhavi from Nagpur saved the life of a four month old girl from Chennai in flight | नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

Next
ठळक मुद्देश्वास व हार्टबीट एकाएकी झाल्या होत्या बंद : सिंगापूरसाठी उडाले होते विमान

नागपूर : चेन्नई विमानतळावरून सिंगापूरसाठी विमानाने उड्डाण घेतले. अर्ध्या तासाने चेन्नईच्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास व हार्टबीट बंद पडले. पायलटने मदतीसाठी घोषणा केली. याच विमानात असलेल्या नागपूरच्या डॉ. वैभवी खोडके लगेच मदतीसाठी सरसावल्या. चिमुकलीवर उपचार केले व पुढील सात-आठ मिनिटांत तिचा श्वास परत आला. १५ मिनिटांच्या अस्वस्थेनंतर विमानातील सर्वांनीच टाळ्यांच्या कडकडाटात वैभवीवर काैतुकाचा वर्षाव केला.

इंडिगोच्या फ्लाईटने बुधवारी सकाळी ४.३० वाजता सिंगापूरसाठी झेप घेतली. अर्ध्या तासानंतर पुढच्या भागात रडारड सुरू झाली. पालकांसोबत चेन्नईवरून बसलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास बंद झाला होता. हृदयाचे ठोकेही शांत झाले होते. क्रू मेंबरने पायलटला ही माहिती दिली. पायलटने लगेच मदतीसाठी घोषणा केली. याच विमानात नागपूरच्या डॉ. वैभवी यशवंत खोडके होत्या. वैभवीने डिगडोहच्या लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयातून नुकतीच एमबीबीएस चाैथ्या वर्षाची परीक्षा दिली आहे. परीक्षा संपल्यामुळे ती सिंगापूरला फिरण्यासाठी जात होती.

पायलटची घोषणा ऐकून डॉ. वैभवीने मदतीसाठी धाव घेतली. चिमुकलीला मांडीवर घेत उपचार केले. सात-आठ मिनिटांनी चिमुकलीने उलटी केली व श्वास घेऊ लागली. चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे आई-वडील सुखावले. डॉ. वैभवीने चिमुकलीचा जीव वाचविल्याची घोषणा पायलटने माईकरून करताच सर्व प्रवाशांनी उभे राहून टाळ्या वाजवित डॉ. वैभवीचे कौतुक केले आणि वैभवीच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.

वैभवीच्या सल्ल्यानंतर विमानाचे पुन्हा लँडिंग

उपचारानंतर चिमुलकी श्वास घेऊ लागली होती. सिंगापूरला पोहोचायला आणखी साडेतीन तास लागणार होते. त्यामुळे पायलटने डॉ. वैभवीचा सल्ला घेतला. मुलीने उलटी केली असल्यामुळे तिला त्वरित पुढील उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विमान चेन्नईला परत नेणे योग्य राहील, असा सल्ला डॉ. वैभवीने दिला. पायलटने तो मान्य करीत विमान परत चेन्नईला लँड केले. तेथील वैद्यकीय चमू तत्काळ विमानात दाखल झाली. विमान परत आणण्याचा योग्य सल्ला दिल्यामुळे वैद्यकीय चमूनेही वैभवीचे कौतुक केले.

Web Title: doctor vaibhavi from Nagpur saved the life of a four month old girl from Chennai in flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.