भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्रात दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 07:46 PM2019-10-29T19:46:28+5:302019-10-29T19:47:25+5:30

नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार असल्यामुळे, नागपूर विधी क्षेत्रात दिवाळीसारखा आनंद साजरा केला जात आहे.

Diwali in Nagpur legal area due to future Chief Justice Sharad Bobade | भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्रात दिवाळी

भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्रात दिवाळी

Next
ठळक मुद्देप्रतिष्ठा शिखरावर पोहचवली : विधिज्ञांनी प्रतिक्रियांतून व्यक्त केला अभिमान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार असल्यामुळे, नागपूर विधी क्षेत्रात दिवाळीसारखा आनंद साजरा केला जात आहे. न्या. बोबडे यांनी श्रीमंत परंपरा लाभलेल्या नागपूर विधी क्षेत्राची प्रतिष्ठा शिखरावर पोहचवली आहे. त्यामुळे यासंदर्भात ‘लोकमत’ने नागपूरकर विधिज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सर्वांनी अभिमानास्पद विचार व्यक्त केले.

न्या. बोबडे विदर्भाचे भूषण
न्या. शरद बोबडे विदर्भाचे भूषण आहेत. ते उत्कृष्ट वकील होते. त्यानंतर त्यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही सर्वोत्तम कार्य केले. ते देशाचे दुसरे नागपूरकर सरन्यायाधीश असणार आहेत. त्यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांना सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठी अभिमानास्पद ठरेल, असा विश्वास आहे.
अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, ज्येष्ठ वकील, हायकोर्ट.

आदर्श निर्माण केला
न्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे ही अतिशय आनंदाची व गर्वाची बाब आहे. विशेषत: न्या. बोबडे यांच्यामुळे नवीन वकिलांपुढे आदर्श निर्माण झाला आहे. कर्तृत्व सिद्ध केल्यास न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदापर्यंत पोहचता येऊ शकते, याची प्रेरणा त्यांच्याकडून वकिलांना सतत मिळत राहील. त्यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्राची मान आणखी उंचावली आहे.
अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, ज्येष्ठ वकील, हायकोर्ट.

न्या. बोबडे यांच्यावर अभिमान
न्या. शरद बोबडे यांच्यावर अभिमान आहे. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला यांच्यानंतर न्या. बोबडे यांच्या रूपाने दुसरे नागपूरकर विधिज्ञ देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. ते ५२३ दिवस सरन्यायाधीशपदी कार्य करणार आहेत. दरम्यान, ते आपल्या कार्याने नागपूरचे नाव आणखी उंचावर नेतील, असा विश्वास आहे. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द गर्व करावा, अशी राहिली आहे.
अ‍ॅड. राजेंद्र डागा, प्रसिद्ध फौजदारी वकील, हायकोर्ट.

सरन्यायाधीशपदासाठी योग्य व्यक्ती
न्या. शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदासाठी योग्य व्यक्ती आहेत. ते नागपूरकर असल्यामुळे नागपूर विधी क्षेत्राचा सन्मान वाढला आहे. न्या. बोबडे यांनी वकिली व्यवसायात असताना जमीनस्तरापासून कार्य केले. त्यांनी सर्व प्रकारची प्रकरणे हाताळली. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे आध्यात्मिक बैठक व सामाजिक दृष्टिकोन आहे. त्याचा लाभ देशाला होईल.
अ‍ॅड. पद्मा चांदेकर, अध्यक्ष, विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशन.

अभिमानाची बाब आहे
न्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे. ते या पदाकरिता सर्व बाबतीत पात्र व्यक्ती आहेत. त्यांनी सर्वांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ वकील, हायकोर्ट.

स्वागतार्ह नियुक्ती
न्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. ते या पदाकरिता सर्व बाबतीत पात्र व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
अ‍ॅड. सुनील मनोहर, वरिष्ठ वकील, हायकोर्ट.

सरन्यायाधीशपदासाठी पात्र व्यक्ती
न्या. शरद बोबडे हे देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी सर्व दृष्टीने पात्र व्यक्ती आहेत. ते नागपूरचे सुपुत्र आहेत. त्यामुळे नागपूर विधी क्षेत्राला त्यांच्यावर अभिमान आहे. त्यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्राची प्रतिष्ठा शिखरावर पोहचली आहे. त्यांना सरन्यायाधीश म्हणून कार्य करण्यासाठी दीर्घ काळ मिळणार आहे. दरम्यान, ते आदर्श निर्माण करतील याची खात्री आहे.
अ‍ॅड. आनंद जयस्वाल, वरिष्ठ वकील, हायकोर्ट.

हा अभिमानाचा क्षण
न्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यामुळे खूप अभिमान वाटतो आहे. न्या. बोबडे यांना गेल्या ५० वर्षांपासून ओळखतो. त्यांची गुणवत्ता जवळून पाहिली आहे. ते सरन्यायाधीशपदासाठी सर्व दृष्टीने पात्र व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आहे.
अ‍ॅड. सुधीर पुराणिक, ज्येष्ठ वकील, हायकोर्ट.

नागपूरसाठी अभिमानाची बाब
न्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे ही नागपूर विधी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या रुपाने सर्व दृष्टीने योग्य व्यक्ती सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहे. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला यांच्यानंतर नागपुरातील कोणती व्यक्ती सरन्यायाधीश होईल याची उत्सुकता अनेक वर्षे होती. न्या. बोबडे यांचा कार्यकाळ सर्वोत्कृष्ट ठरेल.
अ‍ॅड. गौरी वेंकटरमन, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन.

वकिलांसाठी प्रेरणास्त्रोत
न्या. शरद बोबडे हे वकिलांसाठी प्रेरणास्त्रोत झाले आहेत. परिश्रम घेतल्यानंतर न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदापर्यंत पोहचता येऊ शकते ही प्रेरणा येणाऱ्या काळात वकिलांना मिळत राहील. न्या. बोबडे यांनी नागपूरमध्ये विविध न्यायालयांत वकिली व्यवसाय केला. त्यामुळे त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे ही विधी क्षेत्रासह संपूर्ण नागपूरकरिता गर्वाची बाब आहे.
अ‍ॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन.

Web Title: Diwali in Nagpur legal area due to future Chief Justice Sharad Bobade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.