बंदीनंतरही बाजारात पोहोचला नायलॉन मांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 01:01 PM2021-12-07T13:01:12+5:302021-12-07T13:07:27+5:30

नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. गेल्या काही वर्षांत तर नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने जीव जाण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे महापालिकेने याच्या विक्री व खरेदीवर आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

despite of ban nylon manja still available in market for sale | बंदीनंतरही बाजारात पोहोचला नायलॉन मांजा

बंदीनंतरही बाजारात पोहोचला नायलॉन मांजा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन सुस्त : नागपुरात होतो ५० कोटींचा व्यवसाय; मनपाची बंदी

नागपूर : राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी टाकली आहे. यावर्षी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मनपाने २ डिसेंबरला परिपत्रक काढून नायलॉन मांजाच्या विक्री व खरेदीवर पुन्हा एकदा बंदी टाकली आहे. मात्र, तरीही या मांजाची सर्रासपणे विक्री होत असल्याचे चित्र आहे.

 मकरसंक्रांतीच्या पर्वावर पंतगोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शहरात विविध ठिकाणांवरील दुकानात पतंग व मांजाची विक्री होत अते. मात्र, नायलॉन मांजानमुळे अनेकदा अपघात घडले असून मनपाने यावर बंदी घातली आहे. कोणाकडेही हा मांजा आढळल्यास त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानंतरही इतवारीतील पतंगाच्या ठोक बाजारात नायलॉन मांजाची आवक सुरू झाली असून, किरकोळ विक्रेत्यांना विक्री सुरू झाली आहे. दुसरीकडे मनपाची यंत्रणा सुस्त असून, कारवाई सुरू केलेली नाही.

नागपुरात होते ५० कोटींच्या नायलॉन मांजाची उलाढाल

प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने बाजारपेठेत नायलॉन मांजाची आवक डिसेंबर महिन्यातच सुरू झाली आहे. ठोक विक्रेते मांजाचा साठा ठरावीक जागेवर करीत असून, त्यांच्या ठरलेल्या किरकोळ विक्रेत्यांना पाठविण्यात येत आहे. नायलॉन मांजाचा व्यवसाय हा फायद्याचा व्यवसाय असल्यामुळे व्यापारी हा व्यवसाय प्रशासनाच्या मनाई आदेशानंतरही कधीही बंद करणार नाही, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एक विक्रेत्याने दिली. मकरसंक्रांतीच्या अखेरच्या चार दिवसात जवळपास ५० कोटींच्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे व्यापारी म्हणाले.

नायलॉन मांजा चीनमधून येतच नाही

आधी नागपुरात येणाऱ्या चिनी नायलॉन मांजाची आवक आता चीनमधून पूर्णपणे बंद झाली आहे. नायलॉन मांजाची सर्वाधिक आवक उत्तर प्रदेशाच्या बरेली आणि गुजरातच्या वडोदरा येथून नागपुरात होते. व्यापाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी दिलेली ऑर्डर नागपुरात पोहोचू लागली आहे. तयार मांजाची चक्री किमान ५०० रुपयांना बाजारात मिळत आहे. अनेक पतंगप्रेमी आतापासून खरेदी करून स्टॉक करीत आहेत, तर काहींनी विक्रेत्यांना ऑर्डर दिल्याची माहिती आहे. महापालिकेने यंदा मकरसंक्रांतीच्या सुमारे दीड महिनाअगोदर परिपत्रक काढल्यामुळे महापालिकेला यंदा विक्रेत्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

पक्षी व नागरिकांना होते गंभीर दुखापत

दरवर्षी नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. गेल्या काही वर्षांत तर नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने जीव जाण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे हा धोका लक्षात घेता महापालिकेने याच्या विक्री व खरेदीवर आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व झोनमधील सहायक आयुक्तांना शहरातील पतंग विक्रेत्यांवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन कायद्याच्या पाचव्या कलमांतर्गत एखाद्या व्यक्तीने या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. व्यापारी म्हणाले, पतंगाच्या दुकानाची पूर्ण झडती घेतली तरी त्यात नायलॉनचा मांजा सापडणार नाही. पण एकदा तुम्ही दुकानात गेलात, तुम्ही योग्य ग्राहक आहात यावर विक्रेत्यांचा विश्वास बसला की विक्रेते दुसऱ्या ठिकाणाहून नायलॉनचा मांजा आणून देतात.

प्लॅस्टिक पतंग विक्रीवरही बंदी

गेल्यावर्षीही महापालिकेने नायलॉन मांजाच्या विक्री व खरेदीवर बंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. उपद्रव शोध पथकाने नायलॉन मांजा जप्त करत सुमारे १.३० लाखांचा दंड वसूल केला होता. यंदाही ही जबाबदारी उपद्रव शोध पथकाला देण्यात आली आहे. नायलॉन मांजासोबतच प्लॅस्टिकच्या पतंग विक्रीवरही बंदी लावण्यात आली आहे.

Web Title: despite of ban nylon manja still available in market for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.