लोकशाही गंभीर संकटात, जेपींच्या जनआंदोलनाची गरज : ज्ञानेंद्र कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:42 PM2019-10-11T23:42:08+5:302019-10-11T23:42:29+5:30

आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.

Democracy in critical crisis, needs JP's mass agitation: Gyanendra Kumar | लोकशाही गंभीर संकटात, जेपींच्या जनआंदोलनाची गरज : ज्ञानेंद्र कुमार

लोकशाही गंभीर संकटात, जेपींच्या जनआंदोलनाची गरज : ज्ञानेंद्र कुमार

Next
ठळक मुद्देजयप्रकाश नारायण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षात देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक लाभ देणाऱ्या संस्थांचे खासगीकरण केले जात असून शासकीय संस्थांची स्वायत्तता संपविण्यात येत आहे. राज्य व स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करून सर्वांना केंद्राच्या हातचे बाहुले करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला संपविण्यात येत आहे. नावापुरती मतदान प्रक्रिया आहे, पण नागरिकांचे मतदानाचे स्वातंत्र्यच हिरावले जात आहे. आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनोबा विचार केंद्रातर्फे सर्वोदय आश्रम, धरमपेठ येथे ‘आजची लोकशाही आणि जयप्रकाश’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश पांढरीपांडे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, आश्रमाचे ट्रस्टी अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कुमार पुढे म्हणाले, केंद्र सरकारने स्वत:ला माहितीच्या अधिकारातून वगळले. सरकारचा तोटा कमी करण्यासाठी आरबीआयकडून १.६७ लाख कोटी रुपये काढण्यात आले. आता माहितीचा अधिकारच निरस्त करण्यात आल्याने आरबीआयकडून घेतलेला पैसा कुठे खर्च केला, याची माहितीही लागणार नाही. मत मागण्यासाठी जाती धर्माचा खुलेआम उपयोग केला जात आहे. प्रचंड बहुमताचे सरकार केंद्रात आहे व विरोधी पक्षाला संपविण्यात आले असून विरोधी सरकारे पाडली जात आहेत. निवडणूक आयोग, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक संस्था, विरोधी पक्ष, न्यायपालिका व नागरिकांना माहीत न करता संसदेत ४० विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आली. बीएसएनएल, रेल्वे अशा मजबूत सार्वजनिक संस्था बंद पाडून खासगी हातात दिल्या जात आहे. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत.
जयप्रकाश यांना सामुदायिक लोकशाही व पंचायत अधिकार महत्त्वाचे होते व ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते. मात्र सरकारद्वारे संपूर्ण सत्ता केंद्राकडे एकवटण्याचे काम करीत आहे. अर्थव्यवस्था बुडत आहे व बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संघीय व्यवस्था कमजोर करून विघटनाची स्थिती वाढवली जात आहे. विषमता वाढली आहे. सर्व माध्यमे उद्योगपतीच्या हातचे खेळणे झाले आहे.
म्हणूनच ही अराजकता चालली असताना जनउपयोगी मुद्दे सोडून सरकारचे महिमामंडन करीत काश्मीर आणि पाकिस्तानकडेच लक्ष विचलित केले जात आहे. ही स्थिती ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. जेपींच्या अपेक्षेनुसार नागरिकांमध्ये क्षमता व सत्यासाठी चिंता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जेपी, गांधी आणि आंबेडकरी विचाराचे एकत्रित जनआंदोलन उभे राहण्याची नितांत गरज असल्याचे मनोगत ज्ञानेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. संचालन संदेश सिंगलकर यांनी तर वंदन गडकरी यांनी आभार मानले.

Web Title: Democracy in critical crisis, needs JP's mass agitation: Gyanendra Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर