नागपूर जिल्ह्यातल्या कुहीतील वाघाच्या मृत्यूने अधिवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 09:17 AM2020-09-15T09:17:10+5:302020-09-15T09:17:33+5:30

विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे.

The death of a tiger in Kuhi in Nagpur district has again raised the issue of habitat | नागपूर जिल्ह्यातल्या कुहीतील वाघाच्या मृत्यूने अधिवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

नागपूर जिल्ह्यातल्या कुहीतील वाघाच्या मृत्यूने अधिवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या कुही वनपरिक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी दोन वर्षाचा नर वाघ मृतावस्थेत आढळला. त्याच्या शवविच्छेदनानंतर आपसी लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. अर्थात ही लढाई बलाढ्य वाघासोबत झाली असावी, असाही अंदाज आहे. वाघांच्या अधिवासातून ही घटना घडल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने वाघांच्या अधिवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कुही वनपरिक्षेत्राच्या वन खंड क्रमांक ३६५ मध्ये मृतावस्थेत आढळलेला हा नर वाघ वाघ टी-१७ या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक आहे. त्याचे या भागात वास्तव्य होते. अलीकडच्या काळात या जंगलात ब्रह्मपुरीच्या जंगलातील टी-२२ या प्रौढ वाघाचे आगमन झाले आहे. अर्थात अधिवासाच्या लढाईतून या दोघांमध्ये झुंज झाली असावी, असा अंदाज आहे.

विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. परिणामत: या क्षेत्रातून स्थलांतरित झालेल्या वाघांची संख्या ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्ये वाढली आहे. तिथेही संख्या वाढत असल्याने वाघ आता नव्या क्षेत्रात स्थलांतरित होत आहेत. हा बदल लक्षात घेऊन वनविभागाकडून संसाधनांसह निधीसारख्या नियोजनाची अपेक्षा आहे. वनविभागाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, प्राणहिता आणि चपराळा अभयारण्य घोषित केले आहे तर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील कोलमार्का हे रानम्हशींसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे. नव्या अधिवासांच्या शोधात निघालेल्या वाघांसाठी हे संरक्षित क्षेत्र सोईचे असले तरी अद्याप बºयाच तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही.

एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाण्यासाठी वाघ वापरत असलेले भ्रमणमार्ग आता कालवे, लोहमार्ग, खाणी, रस्ते आणि मानवी अतिक्रमणामुळे प्रभावित होत आहे. हे भ्रमणमार्ग मोकळे करण्यावर सरकारने भर देणे, त्यातील मानवी अतिक्रमण दूर करणे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरत आहे. राज्य वन्यजीव सदस्यांच्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांपुढे या विषयावर चर्चा झाली होती. वाढत्या घटना लक्षात घेता सरकार व वन विभागाकडून कृतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अडथळे दूर व्हावेत
विदर्भातील अनेक भागातून वाघांचा कॉरिडोर जातो. मात्र त्यात मागील काही वर्षात बरेच अडथळे वाढले आहेत. अलीकडे विविध कारणांमुळे हे मार्ग बाधित झाल्याने वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. वाघांची संख्या वाढली. त्यामुळे बफर क्षेत्रात अधिवास वाढला आहे. आता तर हे बफर क्षेत्रही अपुरे पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: The death of a tiger in Kuhi in Nagpur district has again raised the issue of habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ