झिरो माईल संवर्धनाची योजना तयार करा; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 08:57 PM2021-01-27T20:57:16+5:302021-01-27T20:57:35+5:30

Nagpur news येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये सिव्हिल लाइन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईलच्या संवर्धनाची योजना तयार करा व पुढील तीन आठवड्यात त्याचा अहवाल द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व महानगरपालिकेच्या हेरिटेज संवर्धन समितीला दिला.

Create a zero mile conservation plan; Order of the High Court | झिरो माईल संवर्धनाची योजना तयार करा; हायकोर्टाचा आदेश

झिरो माईल संवर्धनाची योजना तयार करा; हायकोर्टाचा आदेश

googlenewsNext

शुक्रवारी हेरिटेज संवर्धन समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये सिव्हिल लाइन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईलच्या संवर्धनाची योजना तयार करा व पुढील तीन आठवड्यात त्याचा अहवाल द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकार व महानगरपालिकेच्या हेरिटेज संवर्धन समितीला दिला.

यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट अशोक मोखा, सदस्या प्रा. उज्ज्वला चक्रदेव, अभियंता पी. एस. पाटणकर व दस्तऐवज कक्ष प्रभारी प्रा. नीता लांबे यांनी गेल्या २१ जानेवारी रोजी झिरो माईलचे निरीक्षण केले. दरम्यान, त्यांना झिरो माईलची अत्यंत दुरावस्था झाली असल्याचे व सदर हेरिटेजने मूळ सौंदर्य हरवल्याचे आढळून आले. त्यानंतर समितीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांचे निरीक्षण व सूचना कळवल्या. तसेच, यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. याशिवाय झिरो माईल संवर्धनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने हा आदेश दिला. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनीही सहभागी होऊन झिरो माईल संवर्धनासाठी ठोस निर्णय घ्यावा असेदेखील आदेशात स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात ॲड. कार्तिक शुकुल न्यायालय मित्र असून मनपातर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

समितीचे झिरो माईलविषयी निरीक्षण

१ - झिरो माईलचा मुख्य दगडी स्तंभ जीर्ण झाला आहे.

२ - स्तंभ ठिकठिकाणी फुटत आहे. सौंदर्य हरवले आहे.

३ - स्तंभाचा नैसर्गिक रंग खराब झाला आहे.

४ - स्तंभावरील कॅलिग्राफी अस्पष्ट होत आहे.

५ - परिसरात झाडे-झुडपे वाढली आहेत.

समितीच्या झिरो माईलविषयी सूचना

१ - झिरो माईलचे आर्किटेक्चर इन्स्टिट्यूटमार्फत दस्तऐवजीकरण करण्यात यावे.

२ - झिरो माईल स्तंभाची व्यवस्थित सफाई करण्यात यावी.

३ - स्तंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या आधारावर संवर्धनाची योजना तयार करावी.

४ - स्तंभाच्या संवर्धनाकरिता अनुभवी एजन्सीची नियुक्ती करावी.

५ - झिरो माईलचे मूळ सौंदर्य व महत्त्व परत आणावे. स्तंभावरील कॅलिग्राफीचे जतन करावे.

समितीचे परिसराविषयी निरीक्षण

१ - झिरो माईल परिसराची योग्य देखभाल केली जात नाही.

२ - दगडांची रेलिंग जीर्ण होत आहे. रेलिंगचा मूळ रंग हरवला आहे.

३ - दक्षिण-पूर्व भागातील प्रवेशद्वार दगडाच्या स्तंभापासून वेगळे झाले आहे.

४ - पायऱ्या व लॅण्डस्केपिंगची देखभाल करण्याची गरज आहे.

५ - घोड्यांच्या शिल्पांचे पाय तुटले आहेत. शिल्पाची स्वच्छता करण्याची गरज आहे.

समितीचे निर्देश

१ - झिरो माईलचे मूळ सौंदर्य व ढाचा कायम ठेवून परिसराच्या विकासाकरिता नवीन डिजाईन तयार करावे.

२ - डिजाईनकरिता स्पर्धा आयोजित करून आर्किटेक्चरल फर्म, प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट, शैक्षणिक संस्था व आर्किटेक्ट विद्यार्थ्यांकडून प्रवेश बोलवावे.

३ - सौंदर्यीकरणासाठी उत्तर व दक्षिण भागातील सरकारी जमीन उपयोगात आणावी.

४ - झिरो माईलचे महत्त्व प्रकाशात आणण्याकरिता उपाययोजना कराव्या.

५ - सुरक्षा व्यवस्था व पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा.

Web Title: Create a zero mile conservation plan; Order of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.