आमदार निवासातील कोविड केअर सेंटर होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:11 AM2020-09-20T01:11:21+5:302020-09-20T01:15:12+5:30

७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदार निवासात बनवण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद होण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवून आमदार निवास १ ऑक्टोबरपर्यंत खाली करण्याची नोटीस बजावली आहे.

The Covid Care Center at the MLA's residence will be closed | आमदार निवासातील कोविड केअर सेंटर होणार बंद

आमदार निवासातील कोविड केअर सेंटर होणार बंद

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस१ ऑक्टोबरपर्यंत रुग्णांना इतरत्र स्थानांतरित करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदार निवासात बनवण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद होण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवून आमदार निवास १ ऑक्टोबरपर्यंत खाली करण्याची नोटीस बजावली आहे. या सेंटरमध्ये सध्या १६३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांना इतरत्र स्थानांतरित करण्याची वेळ आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी १६० गाळे परिसराला ३० सप्टेंबरपर्यंत खाली करण्याची नाोटीस बजावलेली आहे. येथे राहणारी कुटुंबे संकटात सापडली आहेत. त्यांनी पीडब्ल्यूडीला पत्र लिहून म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी भाड्याने घर मिळत नाही. त्यामुळे त्यांना हटविण्यात येऊ नये. या समस्येदरम्यान पीडब्ल्यूडीने प्रशासनाला आमदार निवास खाली करण्यासाठी पत्र पाठविले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनीही याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिवाळी अधिवेशनापूर्वी शासकीय इमारती खाली करणे ही एक प्रक्रिया आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. दुसरीकडे सूत्रांचे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांना केवळ दहा दिवसात इतरत्र स्थानांतरित करणे हे आव्हान आहे. या रुग्णांना कुठे हलवायचे, याबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल.
पीडब्ल्यूडीने सध्या तरी रविभवनला खाली करण्याची नोटीस दिलेली नाही. विभागाचे म्हणणे आहे की, तेथील केवळ एकाच इमारतीचा वापर केला जात आहे. अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने त्या इमारतीत कामही कमी करायचे आहे. त्यामुळे ती इमारत उशिराही खाली केली तरी चालेल.

सॅनिटाईझ करून पाच दिवस इमारत बंद ठेवावी लागेल
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले की, आमदार निवासातील इमारत क्रमांक २ व ३ ही कोविडसाठी मार्च महिन्यापासून वापरली जात आहे. अगोदर येथे क्वारंटाईन सेंटर होते. आता त्याचा उपयोग उपचारासाठी होत आहे. अशा परिस्थितीत आमदार निवास खाली झाल्यावर ती पूर्ण सॅनिटाईझ करून पाच दिवस बंद ठेवावी लागेल. त्यानंतरच ती पुन्हा सॅनिटाईझ करून त्याची रंगरंगोटी केली जाईल.

Web Title: The Covid Care Center at the MLA's residence will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.