Counting of votes in 120 polling booths on 20 tables in each round | प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी
प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी

ठळक मुद्देपहिलीचा निकाल जाहीर केल्यानंतरच दुसऱ्या फेरीची मतमोजणीमतमोजणीला १५ ते २० तासांचा वेळ लागणारचिठ्ठी काढून विधानसभा मतदारसंघनिहाय पाच व्हीव्हीपॅटची मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या रामटेकनागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीतील मतांची घोषणा केल्यानंतरची दुसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके व उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.
२३ मे रोजी सकाळी ६.३० वाजता उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित स्ट्रॉग रूम उघडण्यात येतील. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार सघातील १२ विधानसभा मतदार क्षेत्रातील ईव्हीएम वेगवेगळ्या वाहनातून मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षेत पोहविल्या जातील. स्ट्रॉग रुमपासून मतमोजणी केंद्र ५००मीटर अंतरावर आहे. स्ट्रॉगरूममधून वाहनात ठेवताना व मतदान केंद्रावर वाहनातून उतरवताना कंट्रोल युनिटची मोजणी केली जाणार आहे.
एकावेळी २० टेबलवार विधानसभा क्षेत्रनिहाय १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. मतमोजणीला उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता येईल. कुणाला किती मते मिळाली याची नोंद करू शकतील. प्रत्येक टेबलवरील मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती अश्विन मुदगल यांनी दिली. मतमोजणीच्या सुरुवातींच्या प्रत्येक फेरीला ४५ मिनिटे त एक तासाचा वेळ लागेल. मतमोजणीला गती आल्यानंतर प्रत्येक फेरीला ४० ते ४५ मिनिटे लागतील. याचा विचार करता मतमोजणीला १५ ते २० तासांचा कालावधी लागणार आहे.
मतमोजणीसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याला शुक्रवारपासून सुरुवात केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर पिण्याचे पाणी, जेवण, मीडिया सेंटर, अ‍ॅम्बुलन्स, अग्निशमनच्या गाड्या, सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांचा विचार करता मतमोजणी १६ ते २५ फेºयात केली जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी संपूर्ण व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून, ५० व्हिडिओग्राफर यासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. मतमोजणी अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या
दक्षिण- पश्चिम नागपूर -१९
दक्षिण नागपूर -१८
पूर्व नागपूर -१७
मध्य नागपूर -१६
पश्चिम नागपूर -१७
उत्तर नागपूर - १९
काटोल -१७
सावनेर -१९
हिंगणा -२२
उमरेड -२०
कामठी -२५
रामटेक -१८

सात-आठ मतदान केंद्रांवरील मतमोजणी व्हीव्हीपॅटच्या आधारावर
मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी मॉकपोल घेतले जाते. प्रत्यक्ष मतदानाला सुुरुवात करण्यापूर्वी हा डेटा डिलिट के ला पाहिजे. परंतु नागपूर लोकसभा मतदार संघातील चार व रामटेक मतदार संघातील तीन ते चार मतदान केंद्रांवर घेण्यात आलेला मॉकपोलचा डेटा डिलिट करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतमोजणी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून करावी लागणार आहे.
तीनस्तरीय सुरक्षा यंत्रणा
मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ठेवण्यात आल्या आहेत. तर मतमोजणी केंद्राच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था राज्य राखीव दलाकडे आहे. बाहेरच्या परिसरातील सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे.
६० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मतमोजणी
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात १२ विधानसभा मतदार संघ आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतदानाशी पडताळणी केली जाईल. मतमोजणी कुठल्या केंद्राची क रावी, यासाठी मतदान केंद्राच्या नावाचे कार्ड एका बॉक्समध्ये टाकले जातील. यातील पाच कार्ड निवडून मतमोजणी केली जाणार आहे.
काँग्रेसच्या ५१ तक्रारी
निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत नागपूर लोकसभा मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून एकूण ५१ तक्रारी दाखल करण्यात आल्या. सतीश उके आणि आशिष देशमुख यांची प्रत्येकी एक तक्रार होती. यात ईव्हीएमसंदर्भात २५, बोगस मतदान ३, पोलिंग बुथ २ आदींचा समावेश होता. रामटेक लोकसभा मतदार संघात चार तक्रारी काँग्रेसकडून करण्यात आल्या. सर्व तक्रारींची पडताळणी करून योग्य उत्तर दिल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले.


Web Title: Counting of votes in 120 polling booths on 20 tables in each round
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.