CoronaVirus : नागपूरचे  हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्कमध्ये कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:51 PM2020-03-28T22:51:44+5:302020-03-28T22:53:13+5:30

संत्रानगरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्क येथे कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रकृती चांगली असल्याची व स्वत:ला इतरांपासून २१ दिवसासाठी वेगळे ठेवल्याची माहिती दिली.

CoronaVirus : Prince Tuli, a Nagpur hotel businessman, is in Corona in New York | CoronaVirus : नागपूरचे  हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्कमध्ये कोरोना

CoronaVirus : नागपूरचे  हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्कमध्ये कोरोना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकृती चांगली असल्याची दिली माहिती

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : संत्रानगरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्क येथे कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रकृती चांगली असल्याची व स्वत:ला इतरांपासून २१ दिवसासाठी वेगळे ठेवल्याची माहिती दिली. प्रिन्स तुली हे प्रसिद्ध व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांचे भाचे आहेत.
अमेरिका येथे परिस्थिती आटोक्यात आहे. नागरिक सरकारला पूर्णपणे सहकार्य करीत आहेत. ते लॉकडाऊनचे व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत आहेत. तसेच, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची अमेरिकेत प्रशंसा केली जात आहे असे तुली यांनी सांगितले.
अमेरिकेतील नागरिक सोशल मीडियावरील पोस्टस्ला महत्त्व देत नाहीत. ते केवळ सरकार व स्थानिक प्रशासनाच्या माहितीवर विश्वास ठेवतात. ते सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे प्रामाणिकपणे पालन करीत आहेत. अमेरिकेतील भारतीयांना त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची चिंता आहे. ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत असतील व स्वत:ची काळजी घेत असतील असे त्यांना वाटत आहे. अमेरिकेतील रस्त्यांवर आर्मी तैनात करण्यात आली आहे. रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली आहेत. तुलनेने भारतात तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो असे तुली म्हणाले.
अमेरिकेतील शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. अमेरिकेतील डॉक्टरांनी या संकटातून लवकरच बाहेर पडण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तात्काळ वेगळे केले जात आहे. भारतात पंतप्रधानांनी लक्ष्मण रेषा आखली आहे. भारतीयांनी त्याचे पालन केले पाहिजे. अमेरिकेत वृत्तपत्रे सॅनिटाईज केली जातात. त्यामुळे वृत्तपत्रांबाबत नागरिकांना भीती वाटत नाही. ते नियमित वृत्तपत्रे वाचत आहेत. कोरोनाबाधितांना विलग केले जात असल्याने सर्वांमध्ये सुरक्षेची भावना आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये. अमेरिकेतील हॉटेल बंद केली आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहे. त्यांची उपासमार होऊ देणार नाही, असे तुली यांनी सांगितले.
पैशांपेक्षा जीव महत्त्वाचा आहे. भारतात गरजूंना अन्नधान्य वितरित केले जात आहे. हे चित्र पाहून मन भरून येते. भारतीयांनी कोरोनाला घाबरू नये. परिस्थितीत सुधारणा होतपर्यंत घरीच रहावे. कोरोनासंदर्भात अफवा पसरविणे थांबवावे. सरकारी आदेशांचे पालन करावे, असे आवाहन तुली यांनी केले.

Web Title: CoronaVirus : Prince Tuli, a Nagpur hotel businessman, is in Corona in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.