Corona virus : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात  ८१७ आयसोलेशन तर २२० विलगीकरण बेडची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 08:47 PM2020-03-24T20:47:17+5:302020-03-24T20:48:33+5:30

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपूरसह जिल्हास्तरावर आयसोलेशनसाठी ८१७ तर विलगीकरणासाठी २२० बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.

Corona virus: 817 isolation and 220 isolation beds in all the districts of Nagpur region | Corona virus : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात  ८१७ आयसोलेशन तर २२० विलगीकरण बेडची सुविधा

Corona virus : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात  ८१७ आयसोलेशन तर २२० विलगीकरण बेडची सुविधा

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या उपाययोजनांना गती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासोबतच संशयित व्यक्तींची तपासणी करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार विभागातील सर्व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपूरसह जिल्हास्तरावर आयसोलेशनसाठी ८१७ तर विलगीकरणासाठी २२० बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.
कोरोना विषाणूसंदर्भात नागपूर विभागात आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात माहिती देताना डॉ. जयस्वाल म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात उपचार व तपासणीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आशावर्कर, आरोग्यसेविका, परिचारिका, तंत्रज्ञ त्यासोबतच सर्व वैद्यकीय अधिकारी यांना उपचारासंदर्भात अवगत करण्यात आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनासंदर्भात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, त्याअंतर्गत ४२० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात १००, भंडारा ६०, गोंदिया २०, चंद्रपूर १५६ तर गडचिरोली ५१ अशा विभागात विलगीकरणासाठी एकूण ८१७ बेड आहेत. त्यासोबतच विलगीकरण, आयसोलेशनसाठी २२० बेड राखीव आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ७० तर मेयोमधील ६० बेडचा समावेश आहे. यासोबतच आवश्यकतेनुसार खासगी हॉस्पिटलमध्ये असलेल्या १६६१ आयसीयू बेडसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत.

८८ प्रकारच्या जीवनावश्यक औषधांची उपलब्धता
कोरोना विषाणूसंदर्भात आरोग्य यंत्रणेला आवश्यक असलेले एन-९५ मास्क, पर्सनल प्रोटेक्शन किट, ट्रिपललेअर मास्क, सेफ्टी कीट आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, जिल्हास्तरावरही ते मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासोबतच आवश्यक खबरदारी घेण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक नियंत्रण ठेवत असून, त्यांच्या मागणीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या ८८ प्रकारच्या जीवनावश्यक औषधी विभागातील सर्व जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.

व्हेंटीलेटर हाताळण्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत व्हेंटीलेटर हाताळण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्हेंटीलेटर हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. व्हेंटीलेटर हाताळणीच्या प्रशिक्षणांतर्गत विभागातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यातून ४० अशा विभागातील २४० जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागात तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे प्रशिक्षण प्रात्यक्षिक स्वरूपाचे असून, भविष्यातील उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Corona virus: 817 isolation and 220 isolation beds in all the districts of Nagpur region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.