नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा भडका; १३२ बंदिवान पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 09:24 PM2020-07-09T21:24:25+5:302020-07-09T21:26:07+5:30

मध्यवर्ती कारागृहात १३२ बंदिवान पॉझिटिव्ह आले, तर इतर ठिकाणाहून १२ रुग्णांचे निदान झाल्याने १४४ रुग्णांची नोंद झाली.

Corona blast at Nagpur Central Jail; 132 detainee positive | नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा भडका; १३२ बंदिवान पॉझिटिव्ह

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा भडका; १३२ बंदिवान पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे१४४ रुग्णांची नोंद आणखी दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीमुळे १५ ते ३० मिनिटात अहवाल येऊ लागल्याने चाचण्यांची गती वाढली आहे तर दुसरीकडे रुग्णांची संख्याही वाढली आहे. मध्यवर्ती कारागृहात ही चाचणी केली असता १३२ बंदिवान पॉझिटिव्ह आले, तर इतर ठिकाणाहून १२ रुग्णांचे निदान झाल्याने १४४ रुग्णांची नोंद झाली. कोरोना प्रादुर्भावातील या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या २०७१ वर पोहचली आहे. यात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२ झाली आहे. रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीला ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मंजुरी दिली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात १५ हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. या किटच्या मदतीने सध्यातरी शहरात बंदिवानांची चाचणी केली जात आहे, त्यानुसार १३२ बंदिवान पॉझिटिव्ह आले. कारागृहात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७९ झाले आहे. विशेष म्हणजे, लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची मेयो, मेडिकलमध्ये तपासणी करून त्यांना कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे.

मेयोच्या एका निवासी डॉक्टरसह १२ पॉझिटिव्ह आले.
मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. खबरदारी म्हणून डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी अशा २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या शिवाय, ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात कामठी मिल्ट्री हॉस्पिटलमधील एक, जुनी मंगळवारी येथील एक, बगडगंज येथील एक, हनुमाननगर झोनमधील एक, खदान येथील एक तर कुंभारटोली येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात मेयोतून १४, एम्समधून १० तर मेडिकलमधून चार रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४२८ झाली आहे.

दुसऱ्या दिवशीही मृत्यूसत्र सुरूच
बुधवारी तीन रुग्णांचा मृत्यूनंतर गुरुवारी पुन्हा दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. हे दोन्ही रुग्ण नागपूर बाहेरील आहे. यातील एक कोंढाळी येथील रहिवासी ७८ वर्षीय पुरुष आहे. या रुग्णाला ७ जून रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. श्वास घेणे कठीण झाल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत रुग्ण हा अमरावती येथील होता. ६६ वर्षीय या पुरुष रुग्णाला २ जून रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. रुग्णाला पक्षाघातासोबतच इतरही आजार होते. उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला.

१५०० हजार किट्स उपलब्ध
जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होऊन त्यांचा अहवाल तातडीने उपलब्ध होण्याच्या उद्देशाने ‘रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणी’ सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्यशासनाकडून ५ हजार तर विभागीय आयुक्त कार्यालयाने १० हजार अशा १५ हजार किट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर जिल्ह्यांनाही ५ हजार किट्स घेण्याचा सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास संस्थात्मक विलगीकरण कक्षाला कोविड केअर सेंटर तयार करण्यात येईल.
डॉ. संजीव कुमार विभागीय आयुक्त, नागपूर

 

Web Title: Corona blast at Nagpur Central Jail; 132 detainee positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.