५६ वर्षांच्या कालखंडात सभापतिविनाच समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:27+5:302021-02-23T04:14:27+5:30

अभय लांजेवार लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नगरपालिकेची स्थापना सन १८६७ ला झाली. ब्रिटिशकाळातील जुलमी ऐतिहासिक घटनांची साक्षीदार उमरेड ...

Committees without a chairman for a period of 56 years | ५६ वर्षांच्या कालखंडात सभापतिविनाच समित्या

५६ वर्षांच्या कालखंडात सभापतिविनाच समित्या

Next

अभय लांजेवार

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : नगरपालिकेची स्थापना सन १८६७ ला झाली. ब्रिटिशकाळातील जुलमी ऐतिहासिक घटनांची साक्षीदार उमरेड पालिका आहे. गोऱ्यांच्या काळात विविध समित्यांच्या सभापतींची निवड होत नव्हती. अलीकडे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ या अधिनियमानुसार विविध विषय समिती सभापतींच्या निवडीचा प्रवास सुरू झाला. एकूणच सन १९६५ ते २०२१ या तब्बल ५६ वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच उमरेड पालिकेत दोन समितींच्या सभापतिविनाच सभागृह चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.

सोमवारी (दि.२२) झालेल्या विशेष सभेत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिक्षण तसेच महिला व बालकल्याण या दोन समितीच्या सभापती पदावर कुणाचीही निवड होऊ शकली नाही. एकूण २५ नगरसेवकांपैकी एकाही सदस्याचा अर्ज या पदासाठी आलाच नाही, म्हणून सभापतींची निवड झाली नाही. ही नामुष्की पालिकेच्या कार्यकाळात पहिल्यांदाच घडल्याने दोन्ही समित्यांच्या कामकाजाचा ताल बिघडेल, असा आरोप आता सर्व स्तरातून सुरू झाला आहे.

सन २०१६-१७ ला उमरेड पालिकेची निवडणूक झाली. यामध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. भाजपच्या विजयलक्ष्मी भदोरिया यांना उमरेडकरांनी कौल दिला. सोबतच तब्बल १९ नगरसेवकांनी काॅंग्रेसच्या उमेदवारांना चारीमुंड्या चीत करीत विजय खेचून आणला. या निवडणुकीत काॅंग्रेस केवळ सहा नगरसेवकांवर थांबली. तुम्ही आम्हाला मते द्या, आम्ही तुम्हाला ‘विकास’ देणार, असा शब्द प्रचार सभेत दिल्यानंतर उमरेडकरांनी भरभरून मते दिली.

काही वर्षे अत्यंत नियोजनबद्ध पालिकेचा कारभार चालला. वर्षभरापासूनच ताल बिघडला. अशा कोणत्या महत्त्वपूर्ण प्रश्नावरून आणि गंभीर समस्येवरून हे राजकीय नाट्य पालिकेत घडत आहे, ही बाब उमरेडकरांना कळलीही नाही आणि वळलीही नाही. केवळ एकमेकांचा वचपा काढण्यासाठीच उमरेड पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू झाला असल्याची बोंब या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर होत आहे. नगरसेवकच हमरीतुमरीवर आले असून, नागरिकांसाठी या बाबी चिंताजनक ठरत आहेत. सभापतींची निवड न होण्याचा हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला आहे. तत्पूर्वी शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीचे कामकाज चालणार कसे आणि किती दिवस या समित्यांचे सभापतिपद रिक्त राहील, असा सवाल नागरिकांचा आहे.

....

प्रश्न व समस्यांसाठी भांडा

उमरेड पालिकेतील अंतर्गत राजकीय कलहामुळे ‘विकास’कामाचा बळी जात असून, येत्या काही महिन्यात उमरेड पालिकेत राजकीय भूकंप झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही, असेही बोलल्या जात आहे. येत्या वर्षभरात उमरेड पालिकेची निवडणूक होणार असल्याने निदान आता तरी जनतेच्या कामासाठी, त्यांच्या प्रश्न आणि समस्यांसाठी नगरसेवकांनी भांडावे, असा सूर उमरेडकरांमध्ये व्यक्त होत आहे.

....

उमरेडकर बुचकळ्यात

उमरेड पालिकेतील अंतर्गत राजकीय नाट्यमय घडामोडी २६ नोव्हेंबर २०२० च्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नागरिकांसमोर उघडकीस आल्या. यामध्ये भाजपाकडूनच गंगाधर फलके आणि अरुणा हजारे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फलके यांना काँग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या आशीर्वादासह १७ मते मिळाली. हजारे यांना नऊ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश चिचमलकर यांना शून्य मत मिळाले. या संपूर्ण निवडणुकीत कुणाचा फायदा झाला हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावरून कोणकोणत्या पक्षातील या मुद्यावरून उमरेडकर बुचकळ्यात अडकलेत आणि इथूनच उमरेड पालिकेत राजकीय कलहाची ठिणगीसुद्धा पडली. तूर्त तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला केवळ विकास कामे हवी आहेत, असा सूर आळवला जात आहे.

Web Title: Committees without a chairman for a period of 56 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.