"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 20:53 IST2025-12-07T19:05:20+5:302025-12-07T20:53:46+5:30
CM Devendra Fadnavis On Opposition: उपराजधानी नागपूर येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या सात दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राजकीय ...

"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
CM Devendra Fadnavis On Opposition: उपराजधानी नागपूर येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या सात दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या भूमिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून सरकार जर केवळ औपचारिकता म्हणून चहापानाला बोलावत असेल, तर त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्य सरकारची पळून जाण्याची मानसिकता नाही. विरोधी पक्षाच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही समर्पक उत्तरे देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आम्हालाच आमचा आमचा चहा प्यावा लागला. विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशाजनक होती. त्यामध्ये अनेक गमती झाल्या. भास्करराव जाधव यांनी विजय वडेट्टीवार यांच्या माईकचे बॅटरी काढून टाकली आणि आणि भास्करराव जाधव यांना नवीन उपरती झाली की काँग्रेस इमानदार आणि सुसंस्कृत होती. ते होतीच म्हणाले आहे असे म्हणाले नाहीत. त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. वडेट्टीवार यांनी २०१४ च्या पूर्वीचा आणि नंतरचा विदर्भ बघावा," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"विरोधी पक्षाचा सगळ्या संविधानिक संस्थांवर विश्वास उरला नाही. त्यांच्यावर आगपाखड करण्याचे काम ते करत आहेत. आता त्यांना राज्य दिवाळीखोर दाखवण्याची घाई झाली आहे. मी त्यांना स्पष्ट सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेले नाही. ज्या योजना आम्ही हाती घेतलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. ९२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष जे जे प्रश्न विचारेल त्याला समर्पक उत्तर आम्ही देऊ. आचारसंहितेमुळे आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाहीये. तरीही राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची पळून जायची मानसिकता नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.