क्लस्टरमुळे संत्रा जाणार जागतिक बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:45 AM2019-11-01T11:45:13+5:302019-11-01T11:48:29+5:30

डाळिंब आणि द्राक्षाप्रमाणेच आता संत्राही निर्यात होऊन जागतिक बाजारपेठ कब्जा करण्यास सज्ज होणार आहे.

Clusters will turn orange into a global market | क्लस्टरमुळे संत्रा जाणार जागतिक बाजारपेठेत

क्लस्टरमुळे संत्रा जाणार जागतिक बाजारपेठेत

Next
ठळक मुद्देअपेडा बनविणार क्लस्टरकृती आराखडा तयार, शेतकरी आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार

मोरेश्वर मानापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाऑरेंजची संत्रा क्लस्टर स्थापनेची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्णत्वास आली आहे. त्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (अपेडा) संत्रा क्लस्टर स्थापन करणार असून, त्याअंतर्गत तज्ज्ञांतर्फे संत्र्यांची गुणवत्ता सुधारण्यावर शेतकऱ्यांना तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे डाळिंब आणि द्राक्षाप्रमाणेच आता संत्राही निर्यात होऊन जागतिक बाजारपेठ कब्जा करण्यास सज्ज होणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी प्रगत होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. हे क्लस्टर महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे यांच्या पुढाकाराने तयार होत आहे, हे विशेष.
महाराष्ट्रात सांगली येथे डाळिंब आणि नाशिकमध्ये द्राक्षे क्लस्टर कार्यरत आहे. ‘अपेडा’तर्फे तीन ते चार फळांच्या निर्यातीला मदत करण्यात येते. संत्र्यांची निर्यात केवळ बांगलादेशात होते. महाऑरेंजने दुबई, श्रीलंका देशात निर्यातीचा प्रयत्न केला होता, पण यश आले नाही. निर्यातीसाठी आंबे आणि द्राक्षाप्रमाणेच संत्र्याचेही क्लस्टर असावे, अशी संकल्पना श्रीधर ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे काही वर्षांपूर्वी मांडली. यासंदर्भातील पत्र गडकरी यांना दिले. पूर्वीच्या केंद्र शासनामध्ये वाणिज्य मंत्री असलेले सुरेश प्रभू यांनी क्लस्टर मंजूर केले. पण क्लस्टर स्थापनेची खरी सुरुवात बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाली. अपेडाचे झोनल अधिकारी (मुंबई) वाघमारे यांच्याकडे क्लस्टर विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एक हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणार
श्रीधर ठाकरे म्हणाले, बैठकीत निर्यात सल्लागार, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे अनुसंधान संस्थेचे माजी संचालक डॉ. लदानिया, गुणवत्ता विकास तज्ज्ञ, दहा संत्रा उत्पादक शेतकरी, पाच मोठे निर्यातदार, महाराष्ट्र राज्य कृषी विपणन बोर्डाचे अधिकारी, राज्य कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे डीन डॉ. पंचभाई, डीआयसीचे अधिकारी, महाऑरेंजचे मनोज झंझाळ, महाराष्ट्र रुरल लाईव्हहूड मॅनेजमेंटचे (एमआयएलएम) अधिकारी आणि वनामतीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी क्लस्टर स्थापनेवर सहमती दर्शविली आणि मदतीचे आश्वासन दिले. बैठकीत कृती आराखडा तयार करण्यात आला. याअंतर्गत विदर्भातील जास्तीत जास्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सामावून घेण्यावर चर्चा झाली. त्यांना संत्र्याचा दर्जा, गुणवत्ता, पॅकेजिंगसह उत्पादनाची तांत्रिक पद्धतीची माहिती आणि विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
काटोल, सावनेर, कळमेश्वर नरखेड आदी भागांसह विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी शोधून त्यांची नोंद ‘सायट्रस नेट’ सॉफ्टवेअरमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये ५०० ते १००० शेतकऱ्यांची नोंद करण्यात येणार आहे. भविष्यात विदेशातील खरेदीदारांना नागपुरात बोलवून नागपुरी संत्र्याची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय संत्रा महोत्सव केवळ नागपूर वा मुंबईत न घेता दुबई, बहरीन, कतार, ओमान या देशांमध्ये होणाऱ्या महोत्सवात नागपुरी संत्र्याचे प्रमोशन करण्यासाठी जागा मिळवून देण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवाय निर्यातदारांच्या बैठका घेण्यावर भर देण्यात आला.

१५ जानेवारीनंतर होणार निर्यात
श्रीधर ठाकरे म्हणाले, क्लस्टर तयार झाल्यानंतर मृगबहार संत्र्याची गुणवत्ता चांगली आणि खाण्यास गोड असल्यामुळे १५ जानेवारीनंतर निर्यातीवर भर राहणार आहे. महाऑरेंजतर्फे चालविण्यात येणारे पणन बोर्डाचे कारंजा (घाडगे) येथील संत्रा निर्यात केंद्र आणि प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात येणार असून, याकरिता अपेडा आर्थिकदृष्ट्या मदत करणार आहे.

निर्यातीसाठी गुणवत्ता सुधारावी लागणार
ठाकरे म्हणाले, सन २०१५ मध्ये संत्र्याला भाव मिळाला नव्हता, तेव्हा संत्रा क्लस्टरची संकल्पना पुढे आली होती. निर्यातीसाठी सर्वप्रथम संत्र्याची गुणवत्ता सुधारणावर आणि कॉस्मेटिक लूक देण्यावर भर राहणार आहे. जागतिक बाजारात संत्र्याला जास्त भाव आहे. त्यामुळे कीटकनाशकावर भर द्यावा वा नाही, स्प्रे, आकार, उत्पादन प्रक्रिया याची शास्त्रशुद्ध माहिती शेतकºयांना प्रशिक्षणादरम्यान या क्षेत्रातील तज्ज्ञ देणार आहेत. सध्या ३० कंटेनर निर्यातीची मागणी आहे. एका कंटेनरमध्ये २४ टन संत्रा येतो. कंटेनरमधील संत्रा २० ते २५ दिवस थंड राहण्यासाठी मुंबई येथील रेफर कंटरनेटरच्या माध्यमातून संत्रा पाठविण्यात येणार आहे. त्याकरिता बोलणी सुरू आहे. खर्च जास्त आहे. याकरिता अपेडा मदत करणार आहे.

विदर्भात हेक्टरी केवळ ७ टन संत्र्याचे उत्पादन
विदर्भातील शेतकरी तांत्रिकदृष्ट्या शेती करण्यास मागे असल्यामुळे हेक्टरी केवळ ७ टन संत्र्याचे उत्पादन मिळते. पंजाबमध्ये किन्नो संत्र्याचे उत्पादन हेक्टरी २२ टन तर स्पेन देशात ३० ते १०० टन आहे. उत्पादन वाढविण्यासाठी स्पेनचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे संत्रा क्लस्टरमुळे विदर्भातील संत्र्याला भाव मिळेल आणि शेतकरी टप्प्याटप्प्याने प्रगत व आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Clusters will turn orange into a global market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे