काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमचा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:11 PM2020-03-09T23:11:43+5:302020-03-09T23:12:29+5:30

दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दर सोमवारी भरणाऱ्या काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सम्राट अशोक कॉलनी, काशीनगर, रामेश्वरी रोड द्वारकापुरी, हावरापेठ रहिवासी कृती समितीने केली आहे.

Close Kashinagar-Rameswari Weekly Market | काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमचा बंद करा

काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमचा बंद करा

googlenewsNext
ठळक मुद्देरहिवासी कृती समितीची मागणी : महापौर व आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दर सोमवारी भरणाऱ्या काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सम्राट अशोक कॉलनी, काशीनगर, रामेश्वरी रोड द्वारकापुरी, हावरापेठ रहिवासी कृती समितीने केली आहे.
मागील १२ ते १३ वर्षापासून दर सोमवारला काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार भरतो. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर बाजार भरत असल्याने नागरिकांना बाजाराच्या दिवशी घराबाहेर पडता येत नाही. अनधिकृत बाजारावर प्रशासन कारवाई करीत आहे, परंतु ती पुरेशी नाही. महापालिका व पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करून येथील आठवडी बाजार बंद करावा, अशी मागणी रहिवासी कृती समितीचे डॉ. विक्रम कांबळे, सुरेश मून व मधुकर मून आदींनी केली आहे. यासंदर्भात महापौर, मनपा आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
बाजाराच्या दिवशी सडका भाजीपाला लोकांच्या घरासमोरच फेकला जातो. कुठेही करण्यात येणारी लघुशंका, धूम्रपान, मद्यपान आदींमुळे नागरिक त्रस्त असल्याने हा बाजार बंद करण्यासाठी समितीने आंदोलन उभे केले. यासाठी वस्तीतील सम्राट अशोक बुद्धविहार, साई सेवा मंडळ, नागमंदिर, शिवमंदिर, हनुमान मंदिर, संत ताजुद्दीन बाबा मंडळाचे सहकार्य मिळाले. प्रभाग ३३ मधील नगरसेवकांचे सहकार्य आहे. मात्र १७ नोव्हेंबरला शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना विक्रेत्यांनी १७ फेब्रुवारीला मारहाण केली. या प्रकरणात २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
खसरा क्रमांक ५१/१, ५१/२ मौजा बाबुळखेडा काशीनगरात महापालिकेचे चार तुकड्यामध्ये मोकळे भूूखंड आहे. ही जागा मंजूर विकास आराखड्यात भाजी मार्केटसाठी आरक्षित आहे. हा भूखंड कोणत्याही पद्धतीने बाजारासाठी योग्य नाही. लोकवस्तीत असलेल्या या ठिकाणी कुठेही खेळायचे मैदान नाही. येथे गार्डन, क्रीडा संकुल (खेळाचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक आदी), वाचनालय, समाजभवनाचे निर्माण करावे, अशी समितीची मागणी आहे.

कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा
अनधिकृतरीत्या रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर भरणाऱ्या काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमचा बंद करण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

Web Title: Close Kashinagar-Rameswari Weekly Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.