महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 07:50 PM2022-05-19T19:50:08+5:302022-05-19T19:50:54+5:30

Nagpur News एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील महिला लिपीकाने बॅंकेला तब्बल ९७ लाख रुपयांचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे.

Cheating ! 97 lakh transfered from a woman clerk to the bank; Excitement in the bank | महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ

महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देपतीच्या खात्यात केली रक्कम वळती

नागपूर : एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील महिला लिपीकाने बॅंकेला तब्बल ९७ लाख रुपयांचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संंबंधित महिलेने बॅंकेचा आयडी व पासवर्डचा वापर करून स्वतःच्या पतीच्या खात्यात रक्कम वळती केली. ही बाब समोर आल्यानंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांना हादराच बसला. संबंधित महिलेविरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष नगर येथील निवासी स्नेहा तुषार नाईक (वय ३५) ही देवनगर येथील यवतमाळ को-ऑपरेटिव्ह बॅंकेत लिपीक म्हणून कार्यरत आहे. तिच्याकडे बॅंकेच्या गोपनीय दस्तावेजांची माहिती होती. तसेच एकूण उलाढालीबाबतदेखील तिच्याकडे डेटा होता. तिने पती तुषार नाईक व लहान मुलाच्या नावे बॅंकेत खाते उघडले. त्याची माहिती बॅंकेतील कोणत्याही अधिकाऱ्याला दिली नाही किंवा व्यवस्थापकांची परवानगी घेतली नाही. त्यानंतर मागील काही महिन्यात वेळोवेळी तिने त्या खात्यांमध्ये रक्कम वळती केली. अशा पद्धतीने तिने ९७ लाख ६३ हजार ३१३ रुपये पतीच्या खात्यात वळते केले. बॅंकेच्या जमाखर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने चौकशी केली असता ही बाब समोर आली. विशेष म्हणजे तिने सर्व प्रकार बॅंकेचा आयडी व पासवर्डचा गैरवापर करून केला. तिला विचारणा केली असता तिने टाळाटाळ केली. अखेर बॅंकेचे विभागीय अधिकारी सतीश जोशी यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. संबंधित महिलेविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तिला पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.

बॅंकेला माहिती कशी नाही ?

संंबंधित रक्कम ही लहान नाही. इतकी मोठी रक्कम टप्याटप्प्याने एखाद्या खातेदाराच्या खात्यात वळती होत असताना बॅंकेतील एकाही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या महिलेसोबत बॅंकेतील आणखी कुणीदेखील जुळले आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत.

२०१६ सालापासून सुरू होता प्रकार

संबंधित प्रकार २०१६ सालापासून सुरू होता. सहा वर्षांच्या कालावधीत बॅंकेच्या ऑडिटमध्ये हा प्रकार लक्षात कसा काय आला नाही असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. पोलिसांनी बॅंकेचे अकाऊंट स्टेटमेंट मागविले आहे. दरम्यान, तिचा पतीदेखील एका बॅंकेत काम करतो. माझ्या पतीला दुसरीकडून पैसे आले आहेत, असा दावा महिलेकडून करण्यात येत आहे. पतीचीदेखील चौकशी सुरू आहे.

Web Title: Cheating ! 97 lakh transfered from a woman clerk to the bank; Excitement in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.