ब्रिटिशकालीन सारस्वत सभा लायब्ररीची शतकोत्तर वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:08 AM2020-02-19T11:08:01+5:302020-02-19T11:11:04+5:30

२१ सप्टेंबर १९१७ रोजी सारस्वत सभा लायब्ररीची स्थापना नागपुरात झाली. छोट्याशा कौलारू खोलीतून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास आता शंभर वर्षांनंतर तीन मजली टुमदार इमारतीमधून सुरू आहे.

Centenary walk to the British Saraswat Library in British times | ब्रिटिशकालीन सारस्वत सभा लायब्ररीची शतकोत्तर वाटचाल

ब्रिटिशकालीन सारस्वत सभा लायब्ररीची शतकोत्तर वाटचाल

googlenewsNext
ठळक मुद्देधडपडीला आले यशकौलारू झोपडी ते तीन मजली इमारतीचा प्रवास

गोपालकृष्ण मांडवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक बंधने होती. या बंधनातही स्वत:चे अस्तित्व शोधणारी माणसे आपापल्या परीने धडपडत होतीच. अशाच धडपडीतून २१ सप्टेंबर १९१७ रोजी सारस्वत सभा लायब्ररीची स्थापना नागपुरात झाली. छोट्याशा कौलारू खोलीतून सुरू झालेला हा ज्ञानाचा प्रवास आता शंभर वर्षांनंतर तीन मजली टुमदार इमारतीमधून सुरू आहे.
१९१५-१७ या काळामध्ये नागपुरात बंगाली बांधवांची संख्या बऱ्यापैकी होती. दुर्गापूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हे समाजाला एकत्रित येण्याचे साधन होते. त्यामुळे सामाजिक उत्थानासाठी आणि वैचारिक मोट बांधण्यासाठी त्या काळात सुरेंद्रकुमार घोष, नेपाल मजुमदार आणि नागेंद्रनाथ सिन्हा यांनी सारस्वत सभा लायब्ररीची स्थापना केली. यासाठी नागपूर विद्यापीठाचे पहिले व्हाईस चान्सलर बी.के. बोस यांचे मार्गदर्शन मिळाले.
बंगाली समाजबांधवांसाठी एक वैचारिक चळवळ असावी, नव्या पिढीला सर्व लेखकांची पुस्तके वाचायला आणि अभ्यासाला मिळावीत, समाजाचा वैचारिक स्तर उंचवावा, या हेतूने या वाचनालयाची स्थापना झाली. दीनानाथ स्कूलमधील एका लहानशा कौलारू खोलीत या वाचनालयाचा जन्म झाला. बंगाली आणि मराठी समाजातील लोकांकडून गोळा केलेली मोजकी पुस्तके, ग्रंथ आणि शाळेतून मिळालेल्या खुर्च्या, एक टेबल, लाकडी कपाट या जेमतेम साहित्यावर हे वाचनालय सुरू झाले. गर्दी वाढायला लागली. वाचनालयाला स्वत:ची जागा आणि इमारत असावी, असा विचार पुढे आला. पण एवढा पैसा आणायचा कुठून? अखेर वर्गणी उभारून आणि सभासदांनी पदरमोड करून लोकाश्रयाच्या बळावर छोटी धंतोलीमध्ये पाच हजार चौरस फुटाची जागा खरेदी केली. तिथे हक्काच्या जागेत क ौलारू घरातून हे वाचनालय सुरू झाले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्या विचारांचे वारे देशात वाहायला लागले. सामाजिक विकासाच्या दिशेने विचार व्हायला लागला. याच वातावरण हक्काच्या जागेवर वाचनालयाची स्वत:ची इमारत बांधण्याचे ठरले. तत्कालीन राज्य सरकारकडून निधी मिळाला, तर सुमारे ४६ हजार रुपयांचा निधी सभासदांनी उभारला. त्यातून वाचनालयाच्या खालच्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले. नागपूर विद्यापीठातील इंग्रजीचे तत्कालीन विभागाप्रमुख डॉ. आर.एन. रॉय यांनी ५० हजार रुपयांची देणगी दिली. त्यातून विवेकानंद सभागृहाची निर्मिती झाली.
पुढे माणिक रॉय व त्यांच्या कुटुंबीयांनी एक लाख एक हजार रुपयांची देणगी दिली. त्यातून दुसºया मजल्यावर गीता रॉय मेमोरियल हॉलची निर्मिती झाली. पुढे राज्य सरकार आणि राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाऊंडेशन कोलकाता यांनी वाचनालयाला निधी दिला. त्यांच्या सहकार्यातून दुसरा मजला पूर्ण झाला. त्यानंतर काही वर्षांनी तिसºया मजल्याचे काम झाले. न्यायमूर्ती ए.पी. सेन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायमूर्ती ग्यानरंजन सेन मेमोरियल हॉलच्या निर्मितीसाठी एक लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली. त्यातून १९८९ मध्ये तिसºया मजल्याचे काम पूर्ण झाले.
धंतोलीमधील एकेकाळच्या कौलारू घरातील या वाचनालायाला आज तीन मजली इमारतीचे रूप लाभले आहे.
भव्य ग्रंथदालन असलेल्या या वाचनालयात ३० हजार ५२८ ग्रंथ आणि पुस्तकांचा समावेश आहे. वाचनालयाला १९८२ मध्ये ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळाला. २१ दैनिके, ६७ नियतकालिके येथे नियमित येतात. ५५० वाचक सदस्य जुळले आहेत. २०० व्यक्तींची बैठक व्यवस्था असलेले साऊंडप्रूफ सभागृह आणि प्रशस्त वाचनकक्ष हे या वाचनालयाचे वैशिष्ट्य आहे. दररोज सुमारे ३० ते ४० विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी या वाचनकक्षात अभ्यासाला असतात.

दूरदृष्टीतून सुरू झालेली ही सांस्कृतिक वाचन चळवळ यापुढेही आम्ही वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाचनालयाचा रेकॉर्ड संगणकीकृत करणे, हे पुढील मुख्य नियोजन आहे. ज्ञान रुजविण्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न राहील.
- डॉ. तपन चक्रवर्ती, अध्यक्ष

अथक परिश्रमातून सुरू झालेले हे वाचनालय नागपूरपुरते मर्यादित न ठेवता राज्याबाहेर पोहचविणे हा आपला प्रयत्न आहे. स्टडी सेंटरचा दर्जा वाढविण्याचेही नियोजन आहे.
- प्रदीप गांगुली, कोषाध्यक्ष

Web Title: Centenary walk to the British Saraswat Library in British times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.