मनपाची विशेष सभा रद्द ; सत्तापक्षाचे डावपेच नापास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:35 AM2020-03-12T00:35:44+5:302020-03-12T00:37:11+5:30

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प अद्याप सादर न केल्याने नाराज झालेल्या सत्तापक्षाने महापालिकेची विशेष सभा १२ मार्चला बोलवली होती. परंतु बुधवारी प्रशासनाने ही सभा रद्द झाल्याचे पत्र जारी केले.

Cancellation of NMC Special Meeting; The ruling party's strategy has failed! | मनपाची विशेष सभा रद्द ; सत्तापक्षाचे डावपेच नापास!

मनपाची विशेष सभा रद्द ; सत्तापक्षाचे डावपेच नापास!

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थसंकल्पावरून आयुक्तांना घेरण्याची संधी सोडली : २० मार्चला सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प अद्याप सादर न केल्याने नाराज झालेल्या सत्तापक्षाने महापालिकेची विशेष सभा १२ मार्चला बोलवली होती. परंतु बुधवारी प्रशासनाने ही सभा रद्द झाल्याचे पत्र जारी केले. विशेष सभा बोलावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी अर्थसंकल्पासाठी वेळ मागितल्याने सत्तापक्षाचे डावपेच नापास ठरले. या घडामोडीमुळे सत्तापक्षाला माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे.
४ मार्चला स्थायी समिती सदस्यांनी महापौर संदीप जोशी यांच्याकडे मागणी केल्यानुसार १२ मार्चला विशेष सभा बोलवाण्याची नोटीस काढण्यात आली. त्यानंतर ५ मार्चला आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र लिहून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ९५ अंतर्गत मनपाचा २०१९-२० या वर्षाचा सुधारित व २०२०-२१ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वेळ मागितली. आयुक्तांनी ११ किंवा १२ मार्चला वेळ मागितली होती. आयुक्तांनी पत्र दिल्यानंतर विशेष सभेचे औचित्य उरले नव्हते. सभागृहात आयुक्तांकडून हेच सांगितले जाणार होते की, अर्थसंकल्पासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरून आयुक्तांना कोंडीत पकडण्याचे सत्तापक्षाचे डावपेच फेल ठरले आहेत. आयुक्त अर्थसंकल्प कधी सादर करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आयुक्तांना अर्थसंकल्प सादर करण्यासाठी व्यवस्थित पत्र द्यावे, असे कळविले आहे. ११ तारीख गेली व १२ ची सभा रद्द झाली. त्यामुळे १६ तारखेला स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.

आयुक्तांनी वेळ मागितल्याने सभा रद्द
सत्तापक्ष नेता संदीप जाधव म्हणाले, विशेष सभेपूर्वी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. अशा परिस्थितीत सभागृहातही त्यांनी हीच माहिती दिली असती. मी तर वेळ मागितली आहे. परंतु दिली नाही अशी भूमिका मांडली असती. त्यामुळे विशेष सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आयुक्त अर्थसंकल्प कधी सादर करणार याबाबत माहिती नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले

Web Title: Cancellation of NMC Special Meeting; The ruling party's strategy has failed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.