चाळीस एकराचा गोपाळा तलाव गिळंकृत करण्याचा 'बिल्डर लॉबी'चा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:52 IST2025-06-10T18:50:06+5:302025-06-10T18:52:19+5:30

उमरेडचा गोपाळा तलाव विनापरवानगीने बुजविण्याचे काम युद्धस्तरावर : पालिकेला खबरच नाही

Builder lobby's plan to swallow a forty-acre Gopala lake | चाळीस एकराचा गोपाळा तलाव गिळंकृत करण्याचा 'बिल्डर लॉबी'चा डाव

Builder lobby's plan to swallow a forty-acre lake

अभय लांजेवार 
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड :
देशभरात बहुतांश भागात आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जलस्रोत कसा वाढवायचा यावर शासन-प्रशासनाचे चिंतन सुरू आहे. असे असताना चक्क चाळीस एकरात विस्तारलेला तलावच गिळंकृत करण्याचा सपाटा उमरेड येथील गोपाळा तलावावर 'बिल्डर लॉबी'ने सुरू केला. अर्धा डझन जेसीबी, डझनभर ट्रक-टिप्पर आर्दीच्या माध्यमातून तलावात माती टाकण्याचे आणि तलाव बुजवून सपाट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.


उमरेड रेल्वेस्टेशन मागील झोपडपट्टीला लागूनच पुरातन काळातील गोपाळा तलाव आहे. त्याचा भूमापन क्रमांक ३५३ असून ३७ एकर (१४.२७हेक्टर) क्षेत्रात तलावाचा विस्तार आहे. वर्षभर या तलावात पाणी असते. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गोपाळा तलाव येतो. शंभर वर्षापेक्षाही अधिक जुना असलेला हा तलाव शिंगाडे आणि मासेमारीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे.


विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेला हा तलाव चौफेर ग्रीन बेल्ट प्रस्तावित आहे. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असूनही पालिका प्रशासनाला या तलावात नेमके काय सुरू आहे, याची साधी कल्पना नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, अद्याप कुणीही परवानगी घेतली नाही. आम्हाला याबाबत माहिती नाही, असे आश्चर्यकारक उत्तर मिळाले. तब्बल ४० एकरातील 'जलस्रोत' संपविण्याचा हा डाव कुणाच्या आशीर्वादाने सुरू असावा, यावरही तर्कवितर्क लढविले जात आहे. रात्रंदिवस तलाव बुजविण्याचे काम युद्धपातळीवर येथे सुरू असून, नगरपालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून विनापरवानगीने हा सारा प्रकार राजरोसपणे केला गेला. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणीस्रोत संरक्षण कायदेअंतर्गत कारवाईची मागणी केली जात आहे.


मृत तलाव जिवंत करायचे सोडून...
उमरेड शहरात पूर्वी विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. घरासमोरील विहीर बुजवायची असेल, तर नगरपालिकेची परवानगी लागते. असे असताना विनापरवानगीने अख्खा तलावच बुजविला गेला. ही बाब संशयावर बोट ठेवणारी आहे. उपलब्ध पाणीस्रोताचा उपयोग योग्य करून विकासकामे साधणे काळाची गरज आहे. शिवाय काही मृत तलाव, बोढी जिवंत करण्याचे काम सोडून उपयुक्त जलस्रोत संपविण्याचे पाप अयोग्य असल्याच्या उमरेडकरांच्या प्रतिक्रिया आहेत.


लगेच ले-आउट पडणार
शंभर वर्षापेक्षा अधिक आयुष्य असलेल्या या तलावाला विनापरवानगीने बुजविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. अवघ्या काही महिन्यातच याठिकाणी ले-आउटचे कामही सुरू केले जाईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. 


"गोपाळा तलाव नगरपालिका कार्यक्षेत्रात येतो. तलाव बुजविण्याचे काम सुरू असल्याची माहिती नाही. मी चौकशी करते. तलाव खासगी असला तरी या कामाची कोणतीही परवानगी घेतल्या गेली नाही. संबंधितांना नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल."
- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी, नगर परिषद, उमरेड

Web Title: Builder lobby's plan to swallow a forty-acre Gopala lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.