National Inter-Religious Conference: “अबुधाबीत उभं राहत असलेलं मंदिर हे सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण”: ब्रह्मविहारी स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 03:32 PM2021-10-24T15:32:07+5:302021-10-24T15:34:27+5:30

National Inter-Religious Conference: अबुधाबीतील मंदिर एक स्वप्न होते. मात्र ते आता सत्यात येत आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी (Brahmavihari Swami) यांनी सांगितले.

brahmavihari swami said love law life is important in communal harmony at national inter religious conference | National Inter-Religious Conference: “अबुधाबीत उभं राहत असलेलं मंदिर हे सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण”: ब्रह्मविहारी स्वामी

National Inter-Religious Conference: “अबुधाबीत उभं राहत असलेलं मंदिर हे सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण”: ब्रह्मविहारी स्वामी

Next

नागपूर: कुणी तुम्हाला सांगितले असते की, संयुक्त अरब अमिरातीसारख्या मुस्लिम बहुल राष्ट्रात हिंदू धर्माचे मंदिर बांधले जात आहे, तर तुम्ही त्याची चेष्टा केली असती. मात्र, स्वप्नवत असलेली गोष्ट प्रत्यक्षात साकारली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इच्छा तेथे मार्ग हे सिद्ध करून दाखवले. मात्र, अबुधाबीत उभे राहत असलेले मंदिर हे सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी (Brahmavihari Swami) यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत (National Inter-Religious Conference) ते बोलत होते.  

अबुधाबीतील मंदिर एक स्वप्न होते. मात्र ते आता सत्यात येत आहे. अनेकांनी हे स्वप्नच राहील, ते सत्यात उतरणार नाही, असे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले. यासाठी एका मुस्लिम व्यक्तीने जागा दिली. ख्रिश्चन व्यक्तीने स्थापत्य, रचनेची बाजू सांभाळली. या प्रकल्पाचे संचालक म्हणून एका शीख व्यक्तीने काम पाहिले. तसेच बौद्ध धर्मीय व्यक्तीनेही या महत्त्वाचा वाटा उचलला आहे. म्हणूनच हे मंदिर सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण आहे. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगत कम्युनल हार्मनीसाठी एकमेकांना आदर देणे, एकमेकांचा मान-सन्मान राखणेही महत्त्वाचे आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी यांनी नमूद केले. 

प्रसंगी शांतता राखणे, न्यायापेक्षा मोठे आणि महत्त्वाचे

गुजरातमधील स्वामी नारायण मंदिरावर झालेला हल्ला अजूनही मला आठवतो. तेव्हा मी तेथेच उपस्थित होतो. एखाद्या चित्रपटाला लाजवेल, असा बेछूट आणि प्रचंड गोळीबार तेथे झाला. एखाद्या साधुबाबांनी माझ्यासमोरच प्राण सोडले. तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो. पण त्यावेळी आमच्या गुरुंनी शांतता राखण्याचे आवाहन केले. गुजरातमधील काही जणांनी न्याय मिळण्यासाठी ओरड सुरू केली. मात्र, त्यावेळी शांत राहणे आणि शांतता राखणे महत्त्वाचे होते, असे सांगत धर्माधर्मातील वाद संपले, तर कम्युनल हार्मनी प्रस्थापित होणे शक्य होईल, असे स्वामी यांनी सांगितले. 

धर्म आणि अध्यात्म यांची योग्य सांगड महत्त्वाची

भारत विविधतेत एकदा असलेला देश आहे. तसेच भारतात धर्मनिरपेक्षता आहे. कोणताही एक धर्म भारताचा धर्म म्हणून पुढे येऊ शकत नाही. अध्यात्मिकता हा भारतीयांचा आत्मा आहे. मग धर्म कोणताही असो, त्याची शिकवण महत्त्वाची आहे. तसेच धर्म आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालणे तसेच अध्यात्मिक बैठकीला योग्य दिशा देणे महत्त्वाचे आहे. अन्य धर्मियांबाबत आदर राखला पाहिजे. तसेच त्या त्या धर्मातील गुरुंचेही एक महत्त्वाचे कर्तव्य आहे, ते म्हणजे जे विचार तुम्ही एखाद्या व्यासपीठावर किंवा सार्वजनिक स्वरुपात मांडता, तेच विचार तुमच्या अनुयायांसमोर खासगी किंवा वैयक्तिकरित्याही मांडले पाहिजेत, तरच कम्युनल हार्मनी शक्य होऊ शकेल, असे स्वामी म्हणाले.

प्रेम, नियम आणि जीवन ही त्रिसुत्री गरजेची

एका आम्ही गुरुंसोबत इस्रायलमध्ये गेलो होतो. तेव्हा आम्ही सर्वांनी ज्यू धर्मियांच्या प्रार्थना स्थळाला भेट दिली. त्यांचे विचार, संस्कार, आचार, अध्यात्मिक गोष्टी समजून घेतल्या. तसेच एक माणूस किंवा एक व्यक्ती म्हणूनही आपण करत राहिले पाहिजे, अशी शिकवण आम्हाला मिळाली. या आंतरधर्म परिषदेतून जाताना केवळ तीन गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा, एक म्हणजे प्रेम, दुसरे म्हणजे नियम आणि तिसरे म्हणजे जीवन. प्रेम दिल्याने वाढेल. माणूस म्हणून दुसऱ्या माणसावर प्रेम करायला शिकले पाहिजे. एखादे फूल कुस्करले गेले, तरी ते सुगंध देणे सोडत नाही, हीच गोष्ट आपणही शिकली पाहिजे. तसेच आपणच आपल्याला नियम घालून घेतले पाहिजेत. सरकार किंवा शासनाने कायदे किंवा नियम आणेपर्यंत वाट का पाहावी. संयुक्त अरब अमिरातीमध्ये धर्माबाबतचे कायदे, नियम कठोर आहेत. स्वतःला नियम घालून घेतले, तर दुसऱ्यांनी सांगण्याचा प्रश्नच येणार नाही. तिसरे म्हणजे जीवन. जीवन जगायला शिकले पाहिजे. प्राणीमात्रांचे जीवनही महत्त्वाचे असते. त्याच्यावरही प्रेम करायला हवे. आपण पर्यावरण वाचवण्याची ओरड करत असतो. मात्र, ते कुणी वाचवायचे, आपणच ना, असे सांगत त्याचे आचरण आपण केले नाही, तर पर्यावरण वाचवणे किंवा त्याचे संरक्षण करणे केवळ स्वप्नवत राही, असे स्वामी यांनी नमूद केले.
 

Web Title: brahmavihari swami said love law life is important in communal harmony at national inter religious conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.