‘पदवीधर’साठी संदीप जोशी यांना उमेदवारी : भाजपकडून सोलेंचा पत्ता ‘कट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:23 AM2020-11-10T00:23:58+5:302020-11-10T00:25:48+5:30

BJP nominates Sandeep Joshi नागपूर विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी अखेर भारतीय जनता पक्षातर्फे महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

BJP nominates Sandeep Joshi for 'graduate' | ‘पदवीधर’साठी संदीप जोशी यांना उमेदवारी : भाजपकडून सोलेंचा पत्ता ‘कट’

‘पदवीधर’साठी संदीप जोशी यांना उमेदवारी : भाजपकडून सोलेंचा पत्ता ‘कट’

Next
ठळक मुद्दे काँग्रेसच्या वंजारींविरोधात प्रमुख लढत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी अखेर भारतीय जनता पक्षातर्फे महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याअगोदर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले यांचा पत्ता कापण्यात आला असून त्यांच्यासाठी तो मोठा धक्का मानल्या जात आहे. आता विभागात लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे असून काँग्रेसचे अभिजीत वंजारी व भाजपचे जोशी यांच्यातच प्रमुख लढत राहणार आहे.

पदवीधरच्या निवडणुका अपेक्षेपेक्षा अगोदरच जाहीर झाल्यामुळे भाजपने नाराजी दर्शविली होती. त्यातच यंदा परत सोले यांनाच उमेदवारी दिली जाणार की नवीन उमेदवार राहणार, याबाबत विविध कयास लावण्यात येत होते. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात अखेर जोशी यांच्या नावावर पक्षातर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले. जोशी यांची ही पहिलीच विधान परिषद निवडणूक ठरणार आहे. जोशी हे २००२ पासून सलग चार वेळा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करत असून मागील वर्षीपासून शहराच्या महापौरपदाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

काँग्रेसकडून अभिजीत वंजारी हे उमेदवार असून त्यांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. मात्र संदीप जोशी यांच्यासमोर वंजारी यांचेच मोठे आव्हान राहणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून राहुल वानखेडे, परिवर्तनकडून अतुलकुमार खोब्रागडे तर सिनेट परिवर्तन पॅनलकडून प्रशांत डेकाटे हे उमेदवार आहेत. तर विदर्भवादी संघटनांच्या वतीने नितीन रोंघे हेदेखील निवडणूक लढणार आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जोशींसमोर मोठे आव्हान

पदवीधरच्या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बरीच वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१४ साली त्यांच्या जागेवर अनिल सोले यांनी निवडणूक लढविली होती. यंदा जोशी यांच्यासमोर ही परंपरा कायम राखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

अगोदरच दिले होते संकेत

संदीप जोशी यांनी यासंदर्भात अगोदरच संकेत दिले होते. वाढदिवसाच्या दिवशी जनतेशी संवाद साधत असताना जोशी यांनी यानंतर महानगरपालिकेची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच त्यांना विधान परिषदेचे तिकीट मिळू शकते, असे कयास वर्तविण्यात येत होते.

Web Title: BJP nominates Sandeep Joshi for 'graduate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.