हेविवेट नेते असूनही भाजप ‘चेकमेट’; वंजारींकडून नियोजन, नोंदणी अन् संपर्काची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:00 AM2020-12-05T07:00:00+5:302020-12-05T07:00:02+5:30

nagpur news दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही.

BJP ‘checkmate’ despite being heavyweight leader; The three principles of planning, registration and communication from Vanjari | हेविवेट नेते असूनही भाजप ‘चेकमेट’; वंजारींकडून नियोजन, नोंदणी अन् संपर्काची त्रिसूत्री

हेविवेट नेते असूनही भाजप ‘चेकमेट’; वंजारींकडून नियोजन, नोंदणी अन् संपर्काची त्रिसूत्री

Next
ठळक मुद्देसंघ मुख्यालयाच्या मतदारसंघात नेत्यांना अतिआत्मविश्वास भोवला

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी, दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही. तुलनेने नवखे व तरुण असलेल्या वंजारी यांनी आपले कौशल्य दाखवत भाजपच्या धुरिणांना त्यांच्याच कर्मभूमीत धूळ चारली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असली तरी या जागेच्या विजयासंदर्भातील अतिआत्मविश्वास त्यांना भोवल्याचे चित्र आहे.

भाजपने मागील दीड वर्षापासूनच या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याची एकूण हवा बनविली होती. मात्र प्रत्यक्षात माजी आमदार अनिल सोले व काही चेहरे वगळता इतरांचा मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. गडकरी यांचे खंदे समर्थक असलेल्या सोले यांना अखेरपर्यंत उमेदवारी तुमचीच असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात ऐनवेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिल्याने पक्षातदेखील अंतर्गत नाराजीचा सूर होता. पदवीधरच्या मतदारांसाठी जोशी नवीन होते. वेळेवर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनादेखील प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळाला. सोबतच मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाच्या कालावधीत जनसमर्थन लाभत असताना त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने जोशी वादात सापडले होते. मुंढे यांची बदली झाल्यानंतर याबाबतीतील रोष आणखी वाढला होता. सोशल मीडियावर तर जोशी यांच्याविरोधात मोहीमच चालविण्यात आली. मात्र भाजपच्या प्रचारयंत्रणेने या बाबीसह जातीय समीकरणांचा मुद्दा फारसा गंभीरतेने घेतला नाही. याचा फटका निश्चित मतदानादरम्यान बसला.

दुसरीकडे स्वच्छ प्रतिमा आणि कामातील प्रतिभा यांच्या जोरावर वंजारी मतदारांमध्ये गेले. मागील दीड ते दोन वर्षांपासून वंजारी यांचे वैयक्तिक प्रयत्न, नोंदणीवर देण्यात आलेला भर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळापर्यंत संपर्काचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे त्यांना मैदान मारता आले. नागपूर विद्यापीठातील त्यांचे मागील १५ वर्षांचे कामदेखील मतदारांसमोर होते. आधी लगीन पदवीधरचे अशी भूमिका घेत ऐनवेळी गटबाजीला दूर सारत काँग्रेसचे नेते प्रचारात एकत्र आले व वंजारी यांनी अनोखा करिष्मा करून दाखविला. पदवीधरच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश भरला असून भविष्यात भाजपसमोरील आव्हाने वाढणार हे निश्चित आहे.

Web Title: BJP ‘checkmate’ despite being heavyweight leader; The three principles of planning, registration and communication from Vanjari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.