बाल्या बिनेकर हत्या प्रकरण : आणखी दोन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:41 PM2020-09-29T23:41:13+5:302020-09-30T01:00:04+5:30

बाल्या बिनेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. आदर्श ऊर्फ पप्पू अनिल खरे आणि रवी ऊर्फ चिंटू सुरेश नागाचारी अशी या आरोपींची नावे असून त्यांनी या हत्याकांडात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका वठवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Balya Binekar murder case: Two more accused arrested | बाल्या बिनेकर हत्या प्रकरण : आणखी दोन आरोपी गजाआड

बाल्या बिनेकर हत्या प्रकरण : आणखी दोन आरोपी गजाआड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाल्या बिनेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. आदर्श ऊर्फ पप्पू अनिल खरे आणि रवी ऊर्फ चिंटू सुरेश नागाचारी अशी या आरोपींची नावे असून त्यांनी या हत्याकांडात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका वठवल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास बोले पेट्रोल पंप चौकात कुख्यात गुन्हेगार चेतन सुनील हजारे, रजत राजा तांबे, भारत राजेंद्र पंडित, आसीम विजय लुडेरकर आणि त्याच्या अनिकेत नामक साथीदाराने बाल्या बिनेकरची भीषण हत्या केली. अनिकेत फरार असून उपरोक्त चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या कस्टडीत आहेत. गेल्या ४८ तासाच्या चौकशीत आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालविले होते. चारही आरोपी वेगवेगळी आणि विसंगत माहिती देत असल्यामुळे पोलिसांनी चौघांनाही क्रॉस चेक केले. त्यानंतर आरोपी बोलू लागले. या हत्याकांडाचे कट-कारस्थान अनेक दिवसांपूर्वीच रचण्यात आले. त्यानुसार आरोपींनी ऑनलाईन शस्त्र खरेदी केली. आरोपी पप्पू याने शस्त्राचे पैसे चुकविले तर हत्येपूर्वी आणि हत्येनंतर चिंटू नागाचारी याने आरोपींना मदत केल्याचे उघड झाले.

आरोपीची क्रूरता
अटकेतील आरोपी रजत तांबे याने यापूर्वी दिवसाढवळ्या सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील भरत खटवणी नामक व्यापाऱ्याची २०१५ मध्ये हत्या केली होती. त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याला पाहिजे तसा धडा पोलिसांकडून शिकवला गेला नाही. त्यामुळे तो जास्तच निर्ढावला. आता हा गुन्हा करून त्याने क्रूरतेलाही लाजविले. बाल्याची हत्या केल्यानंतर हजारे, लुडेरकर आणि अनिकेत दुसरीकडे पळून गेले. तर पंडितच्या बुलेटवर बसून जाताना काही वेळानंतर तांबे पुन्हा बाल्याच्या मृतदेहाजवळ आला आणि त्याच्या शरीरावर गुप्तीचे घाव घातले. गुप्ती त्याच्या शरीरात फसल्यामुळे आरोपी तांबेने मृतदेहावर पाय ठेवून ती खेचून बाहेर काढली. यावरून त्याच्या क्रूरतेची कल्पना यावी.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पप्पू खरे आणि चिंटूला पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांचा ५ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. दरम्यान, या प्रकरणात आणखी अनेक जणांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गुन्हे शाखेसह शहर पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांनी संशयितांकडे नजर रोखली आहे. नागपुरातील कुख्यात जुगार अड्डा चालकासह अनेकांची चौकशीही पोलिसांनी केलेली आहे.

लोकमतचे वृत्त खरे ठरले
लोकमतने हत्याकांडात पडद्यामागे सूत्रधार दडून असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या घडामोडींमुळे लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे लवकरच होणार आहेत.

Web Title: Balya Binekar murder case: Two more accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.