लघुचित्रपटाच्या माध्यमातून देहदान विषयी जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:57 AM2019-10-17T00:57:10+5:302019-10-17T00:59:56+5:30

मरणोपरांत दान केलेल्या एखाद्याच्या अवयवामुळे एखाद्या गरजू माणसाला नवे जीवन लाभू शकते. ही जागृती करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते, ही बाब डोळ्यासमोर ठेवून काही आंबेडकरी कलावंतांनी ‘देहदान’ या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे.

Awareness about 'body donation' through a miniature film | लघुचित्रपटाच्या माध्यमातून देहदान विषयी जनजागृती 

लघुचित्रपटाच्या माध्यमातून देहदान विषयी जनजागृती 

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेडकरी कलावंतांची संवेदनशील रचना : गावागावात चित्रपट पोहचविण्याची इच्छा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : देहदान व अवयवदान ही आजच्या काळातील महत्त्वाची मानवी गरज आहे. मरणोपरांत दान केलेल्या एखाद्याच्या अवयवामुळे एखाद्या गरजू माणसाला नवे जीवन लाभू शकते. पण भारतात ज्या पद्धतीने देहदानाची जागृती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही. ही जागृती करण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते, ही बाब डोळ्यासमोर ठेवून काही आंबेडकरी कलावंतांनी ‘देहदान’ या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे.
कल्पना तेलंग व कुंदा वानखेडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व कवी नागेश वाहुरवाघ यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. सहनिर्माता पल्लवी गजभिये व सुबोध उके सहायक दिग्दर्शक आहेत. सिनेमॅटोग्राफी अभिलाष विश्वकर्मा यांनी केली. चित्रपटात आभास साखरे, रश्मी नागदेवते, दिनेश मगले, सागर वाडे, सुजाता चंदनखेडे, हर्षाली कवाडे, नेहाल उमरे, स्वप्नील बोंगाडे, शुभांगी सावरकर, अथांग सावरकर, संजय सायरे, अमित दुर्योधन, सुमित्रा निकोसे, मंदा खंडारे, अ‍ॅड. सोनिया गजभिये यांनी अभिनय केला आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलर जारी करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे सर्व कलावंत व पूर्ण टीम नागपूरची आहे.
नागेश वाहुरवाघ यांनी सांगितले, लघुचित्रपट २८ मिनिटांचा आहे. यामध्ये चित्रपटाप्रमाणे प्रेमकहाणीचा ड्रामा आहे. चित्रपटात कॉलेजची पार्श्वभूमी दर्शविली आहे. तारुण्याचे आयुष्य जगताना एका वळणावर नायकाला हृदयाचा आजार असल्याचे कळते आणि एका प्रबोधनातून देहदान करण्याची अंतिम इच्छा त्याच्या मनात येते. प्रेयसीजवळ तो देहदानाची इच्छा करतो. त्याच्या मृत्यूनंतर प्रेयसी त्याचे देहदान करते व त्याच्या अवयवांमुळे गरजूंना लाभ मिळतो. प्रियकर आणि एका आईचा मुलगा मृत्यू पावला तरी त्याच्या अवयवांच्या रुपात तो इतरांमध्ये जिवंत आहे, अशा भावनिक नोटवर संदेश देत चित्रपटाचा शेवट होतो. देहदानाचा संदेश देणारे गाणे व देहदानाविषयी देशातील परिस्थितीची माहिती टाकल्यावर पुढल्या महिन्यात लघुपट रिलीज करण्याची इच्छा दिग्दर्शक वाहुरवाघ यांनी व्यक्त केली. शासकीय प्रकल्पात या लघुपटाचा समावेश व्हावा, अशी इच्छा व्यक्त करीत गावागावात हा संदेश पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Awareness about 'body donation' through a miniature film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.