तेलाच्या पिंपाद्वारे अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:49 PM2020-07-10T23:49:02+5:302020-07-10T23:50:31+5:30

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. पाटणसावंगीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या प्राध्यापकाने ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट सिद्ध केली. प्रा. निखिल मानकर नामक या प्राध्यापकांनी चक्क तेलाच्या पिंपाला इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जोडून अतिशय नाममात्र खर्चात अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन तयार केली आहे.

Automatic hand sanitizer machine by oil tin | तेलाच्या पिंपाद्वारे अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन

तेलाच्या पिंपाद्वारे अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. पाटणसावंगीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या प्राध्यापकाने ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट सिद्ध केली. प्रा. निखिल मानकर नामक या प्राध्यापकांनी चक्क तेलाच्या पिंपाला इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जोडून अतिशय नाममात्र खर्चात अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन तयार केली आहे.
प्रा. मानकर यांचा हा प्रयोग सध्या त्यांच्या निवासी परिसरात आणि कॉलेजमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. कोविड महामारीच्या काळात हातांना निर्जंतुक करणाऱ्या सॅनिटायझरचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना सॅनिटायझर सोबत असणे ही जीवनावश्यक गरज झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन नंतर सुरू झालेली शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांमध्ये अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ४ ते १० हजारापर्यंत मिळणाऱ्या या मशीन्स अतिशय महागड्या असून सामान्य माणसे किंवा ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये ते घेणे शक्य नाही. अशी परिस्थिती लक्षात घेत प्रा. मानकर यांनी केवळ १५० ते २०० रुपयात ही हॅन्ड सॅनिटायझर मशीन तयार केली आहे.
त्यांनी सांगितले, लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन धडे देण्याचे काम चालले आहे. यादरम्यान इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयात मोटरबाबत शिकविताना या प्रकल्पाची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी आधी त्या प्रकल्पाची आकृती काढून विद्यार्थ्यांना समजावली. त्यांनी तेलाच्या पिंपाला एका भागाकडून कापले. बॅटरी व वायरचा वापर करून तयार केलेले सर्किट पिंपामागे जोडले. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून १०-२० रुपयाला मिळणारे सेन्सर विकत आणून पिंपाला जोडले. बाहेर एक सॅनिटायझर भरलेल्या बॉटलमध्ये मोटर फिट केली आणि ती सर्किट व सेन्सरशी जोडली. निव्वळ या सेन्सरसमोर हात नेला तर अ‍ॅटोमॅटिक मशीनच्या कामाप्रमाणे सॅनिटायझर तुमच्या हातावर येते. विशेष म्हणजे याच तंत्राद्वारे सॅनिटायझरऐवजी पाण्याची बॉटल जोडून हात धुण्याची अ‍ॅटोमॅटिक मशीन म्हणूनही याचा उपयोग केला जाऊ शकत असल्याचे प्रा. मानकर यांनी सांगितले. खरेतर टाकाऊ वस्तूंच्या मदतीने अभ्यासक्रमातील वैज्ञानिक प्रयोगांचा आधार घेत दैनंदिन उपयोगात येतील असे महत्त्वपूर्ण उपकरण सहज बनविता येतात, हेच दाखविण्यासाठी हा प्रयोग केल्याची भावना प्रा. मानकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Automatic hand sanitizer machine by oil tin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.