अरिजितचा रोमांच अन् स्वरधारांची बरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:46 AM2018-06-04T10:46:04+5:302018-06-04T10:46:15+5:30

‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंग याने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली.

Aryajit's Thrill and Rainbow Rains | अरिजितचा रोमांच अन् स्वरधारांची बरसात

अरिजितचा रोमांच अन् स्वरधारांची बरसात

Next
ठळक मुद्देअरिजितच्या स्वरांनी बरसल्या जलधारा नागपूरकरांनी अनुभवले मंतरलेले क्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तो येणार..तो येणार या भावनेनेच रोमांचित झालेल्या रसिकांनी खचाखच भरलेल्या मंतरलेल्या वातावरणात त्याने हृदयाची वीणा छेडणारे सप्तसूर लावले अन् स्वरमैफिलीत आलेला प्रत्येक रसिक संगीताच्या दुनियेत हरवला. ‘कभी जो बादल बरसे’ हे गीत गात असताना स्वरधारा बरसल्याचा अनुभव आला अन् काही वेळातच खरोखर जलधारांनी रसिकप्रेक्षक चिंब भिजले. ‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंग याने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली. अरिजित नागपुरात बेफाम गायला आणि त्याच्या गायनाच्या कैफात आकंठ बुडालेल्या रसिकप्रेक्षकांनी कधी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत तर कधी त्याच्या शब्दावर ताल धरीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘जयंती नगरी-७’ या भव्य टाऊनशिप प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी अरिजित सिंग याचा रविवारी आयोजित ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
अभिजित रिअल्टर्स अ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि. यांच्यातर्फे बेसा पिपळा रोडवरील प्रकल्पस्थळीच आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, अभिजित रिअल्टर्स अ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जे.के.मजुमदार, संचालक अभिजित मजुमदार, जयंती मजुमदार, इनू मजुमदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’च्या सुरुवातीलाच अरिजित सिंगने आपल्या अनोख्या शैलीत संवाद साधत नागपूरकरांना जिंकले. गायनाची सुरुवातच त्याने ‘ऐ दिल है मुश्किल’ या गाण्याने केली. त्यानंतर त्याने रसिकांच्या मनाला साद घालणाऱ्या गाण्यांने सर्वांना तृप्त केले. ‘तुझको मै रखलू वहां’, ‘कभी जो बादल बरसे’, ‘ये मौसम की बारीश’ यासारख्या इतर अनेक गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण केले. ‘जो भेजी थी दुवा’ हे गाणे सादर करत असताना त्याने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल से’, ‘बॉम्बे’ चित्रपटातील गाणे गाऊन त्याने प्रेक्षकांमधील उत्साह जागविला. ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ हे गाणे तर त्याने ‘क्लासिक’ पद्धतीने गायले अन् थेट उपस्थितांच्या हृदयालाच हात घातला.
कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाची शक्यता लक्षात घेता ‘ओ कबिरा..’ या गाण्याने त्याने नागपूरकरांचा निरोप घेतला. कार्यक्रमाचे संचालन आर.जे.पल्लवी आणि आर.जे.कुणाल यांनी केले.

Web Title: Aryajit's Thrill and Rainbow Rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.