Arrest of vendors selling food at Nagpur Railway area | नागपुरात रेल्वे परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्हेंडर्सची धरपकड

नागपुरात रेल्वे परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्हेंडर्सची धरपकड

ठळक मुद्देसहा जणांना घेतले ताब्यात : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अधिकृत परवाना असल्याशिवाय रेल्वेगाड्यात किंवा रेल्वेस्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थ विकणे गुन्हा आहे. तरी सुद्धा रेल्वेस्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या सहा व्हेंडर्सविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या लोहापुलाकडील आऊटरकडील भागात त्यांना पकडण्यात आले.
रेल्वेगाड्यात किंवा रेल्वेस्थानकाच्या परिसरात अधिकृत परवाना असल्याशिवाय खाद्यपदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु तरीसुद्धा अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून कुठलाही परवाना नसताना रेल्वेगाड्यात तसेच रेल्वेस्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थांची विक्री करतात. दिवाळीच्या काळात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अवैध व्हेंडरच्या टोळ््या सक्रिय झाल्या आहेत. अवैध व्हेंडर्स आऊटरवरून रेल्वेगाड्यात चढतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे पथक दुपारी १२.३० वाजता लोखंडी पुलाच्या परिसरात तैनात करण्यात आले. पथकाने चहा विक्री करणारे विष्णूसिंग सुरेंद्रसिंग (१९), गौरसिंग तोमर (२१) आणि पंकज तोमर (२२) रा. गायत्री कॉलनी पांढुर्णा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चहा भरलेले कॅन होते. ते घेऊन ते जीटी एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. रामूसिंग लोटनसिंग नावाचा व्यक्ती विना तिकीट गाडीत चढत असताना त्याला पकडण्यात आले. दुपारी ३.३० वाजता आरपीएफचे पथक पुन्हा लोखंडी पूल परिसरात धडकले. यावेळी खाद्य पदार्थांची विक्री करणारा जितेंद्र मिश्रा (३५) बजेरिया, राजकुमार मिश्रा (४०) रा. भिवसनखोरी, चिंतामणनगर आणि चिक्की विक्री करणारा अशोक वागदे (५८) रा. नंदनवन हे रेल्वेगाडीत चढण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना अटक केली. पकडण्यात आलेल्या व्हेंडर्सविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४४, १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Arrest of vendors selling food at Nagpur Railway area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.