नागपुरात कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या विषारी खर्ऱ्याची सर्रास विक्री, वर्षभरापासून कारवाई नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 02:41 PM2021-11-18T14:41:10+5:302021-11-18T14:47:04+5:30

कायद्याचे उल्लंघन करून विक्रेते खर्ऱ्याचा खुलेआम धंदा करीत आहेत. आर्थिक व्यवहारामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलीस यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

arecoline kharra being sold in nagpur street | नागपुरात कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या विषारी खर्ऱ्याची सर्रास विक्री, वर्षभरापासून कारवाई नाहीच

नागपुरात कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या विषारी खर्ऱ्याची सर्रास विक्री, वर्षभरापासून कारवाई नाहीच

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात एफडीएची कारवाई नाहीच

नागपूर : सडकी सुपारी आणि प्रतिबंधित तंबाखूपासून तयार करण्यात येणाऱ्या आणि कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या विषारी खर्ऱ्याची सर्रास विक्री सुरू आहे. विक्रेत्यांवर एक वर्षापासून कारवाई न केल्याने विक्रेत्यांचे फावत आहे. त्यामुळे हा धंदा दिवसेंदिवस फोफावत आहे. शाळकरी विद्यार्थी खरेदीसाठी विक्रेत्यांकडे गर्दी करीत आहेत.

कायद्याचे उल्लंघन करून विक्रेते खर्ऱ्याचा खुलेआम धंदा करीत आहेत. आर्थिक व्यवहारामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलीस यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विक्रेत्यांवर धाडी टाकून त्यांची दुकाने सील करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

राज्यात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध

खर्ऱ्याची निर्मिती मुळात सडकी सुपारी आणि राज्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूपासून केली जाते. नागपुरात जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त पानपटरींवर खर्रा तयार करून विक्री केली जाते. खर्ऱ्याची विक्री विभागाच्या नाकावर टिच्चून करण्यात येते. अन्न व औषध विभागाने एक वर्षांपूर्वी नागपुरातील सर्व पानटपरींची तपासणी करून हजारो किलो खर्रा जप्त करून, काही पानपटऱ्या सील केल्या होत्या. पण वारंवार कारवाई होत नसल्यामुळे खर्रा विक्री पुन्हा दुपटीने सुरू झाली आहे.

शाळेलगतच होते विक्री

शाळेपासून १०० मीटर दूर पानटपरी सुरू ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. पण शहरात त्याचेही उल्लंघन होताना दिसत आहे. मनपाने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्यास व खाऊन थुंकण्यास, तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी जारी केले आहेत. पण विभागाची कारवाई मात्र शून्य आहे.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यास एक हजार, तर निर्मिती, वितरण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध घातला आहे. आता कारवाईच्या मागणीने वेग धरला आहे.

असे आहेत कारवाईचे अधिकार...

तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पानमसाला, मावा व तत्सम पदार्थ खाऊन थुंकणे व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके आहेत. मनपाचे उपद्रवशोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी संबंधित झोनचे सहायक आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

धडक मोहीम राबविणार

नागपुरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असेल, तर विभागातर्फे धडक मोहीम राबविण्यात येईल. या पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यास विभाग सक्षम आहे. यापूर्वीही धडक मोहीम राबविली आहे.

- अभय देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग.

Web Title: arecoline kharra being sold in nagpur street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.