Anil Kilor , Avinash Ghorote from Nagpur recommendation as the judge | नागपूरचे  अनिल किलोर, अविनाश घरोटे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस
अनिल किलोर आणि अविनाश घरोटे

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय कॉलेजियम : एकूण पाच वकिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सोमवारी केंद्र सरकारला केली. अन्य तीन वकिलांमध्ये अ‍ॅड. एन. बी. सूर्यवंशी, अ‍ॅड. माधव जामदार व अ‍ॅड. मिलिंद जाधव यांचा समावेश आहे.
४ मे २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी एकूण १० वकिलांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला सुचविली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या या कॉलेजियमने आवश्यक बाबी पडताळल्यानंतर वरील पाच नावे अंतिम केली. आता या नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी होईल.
अ‍ॅड. अनिल किलोर हे हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष असून, या पदावर कार्यरत असताना न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले ते पहिले वकील होत. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील आहेत. त्यांनी नागपूर येथे अ‍ॅड. अरविंद बडे व अ‍ॅड. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. ते गत २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी लढणारे वकील म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. त्यांनी विविध ज्वलंत विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४० वर जनहित याचिका दाखल केल्या व त्यात सकारात्मक आदेश मिळविले.
अ‍ॅड. अविनाश घरोटे नागपूरकर असून, त्यांचे वडील गुणवंतराव हे वकील होते. एलएलबी पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९८६ पासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना वकिली व्यवसायाचा ३३ वर्षांचा अनुभव आहे. दिवाणी प्रकरणांवर त्यांची विशेष पकड आहे. त्यांनी सर्वाधिक मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला. ते नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी सचिव आहेत.


Web Title: Anil Kilor , Avinash Ghorote from Nagpur recommendation as the judge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.