अंबरिश मिश्र यांनी उलगडला हिंदी चित्रपट गीतांचा स्वरप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:09 AM2020-01-23T01:09:20+5:302020-01-23T01:10:52+5:30

राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिकांना खिळवून ठेवले.

Ambarish Mishra Exposed Hindi Movie Lyrics | अंबरिश मिश्र यांनी उलगडला हिंदी चित्रपट गीतांचा स्वरप्रवास

अंबरिश मिश्र यांनी उलगडला हिंदी चित्रपट गीतांचा स्वरप्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देआठवणीतील गीतांनी व्याख्यान मोहरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिकांना खिळवून ठेवले.
प्रेस क्लबमध्ये ग्रंथप्रेमी मुकुंदराव नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम पार पडला. हिंदी चित्रपटातील गीतांबद्दल ते म्हणाले, अफाट असलेले हे गीतांचे साम्राज्य म्हणजे जणू स्वतंत्र गणराज्यच आहे. या गणराज्यात रसिक हे नागरिक तर रसिक व गाणी ही युती आहे. या साम्राज्यात जीएसटी नाही, सीएए नाही किंवा कसलाही टॅक्स नाही. केवळ निखळ आनंद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हिंदी चित्रपटगीतांचा प्रवास त्यांनी उलगडला. १९६०-७० नंतरच्या दशकातील अनेक प्रसंगांचे साक्षीदार असलेल्या मिश्र यांंनी संगीतक्षेत्रातील अनेक प्रसंग आणि गमतीजमतीही श्रोत्यांना ऐकविल्या. ते म्हणाले, संगीतकार नौशाद हे लोकसंगीताचे उत्तम जाणकार होते. पाश्चात्त्य संगीताचा उपयोग त्यांनी आपल्या संगीतामधून केला. सुहानी रात ढल गयी, कोई सागर दिल को बहलाता नही यासारख्या अनेक गीतांमधून ते आठवणीत राहिले. नौशादांना मुंबईत जाऊन गाणी शिकायची होती, तर अनिल बिश्वास यांना क्रांतिकारी होऊन इंग्रज अधिकाऱ्याचा खून करायचा होता. मात्र पुढे बिश्वास संगीतात रमले. यशवंत देवांच्या अरुण दाते यांनी गायलेल्या गीतांवर तसेच अनिल खळे यांच्या संगीतावर बिश्वास यांचा प्रभाव होता. त्यांची गीते ऐकल्यावर संवेदनशील मनाला जाग आल्यासारखे वाटते, ही त्यांच्या स्वरांची शक्ती होती. नौशाद, अनिल बिश्वास, सी. रामचंद्रन यांनी हिंदी संगीताला आत्मसन्मान दिला. चितळकरांच्या ‘शोला जो भडके’ यासारख्या गाण्यांनी संगीताला नवा बाज दिला.
संगीतकारांचे तेव्हा एकमेकांशी मैत्रीचे संबंध होते. एकमेकांच्या गीतांना चाली सुचविण्यापासून त्यांची सलगी असायची. तलत महमूद आणि नौशाद यांची घट्ट मैत्री होती. मुखर्जी आणि अशोककुमार यांचेही फार सख्य होते. बर्मन यांनी नंतरच्या काळात मोठी झेप घेतली.
ओ.पी. नय्यर वेळेचे फार पक्के होते. एकदा मोहम्मद रफी वेळेवर पोहचले नाही म्हणून पुढची तीन वर्षे त्यांनी त्यांना गाणीच दिली नव्हती, अशी आठवण मिश्र यांनी सांगितली. नौशाद यांनी गझल चित्रपटात आणली आणि रूढ केली. गुलाम हैदर साहेबांनी लता मंगेशकरांना शब्दांचे वजन शिकविले. नय्यर यांनी आशादीदींच्या गळ्याचे सामर्थ्य ओळखले होते. मोहम्मद रफींना नौशाद यांनी शिकविले. अनेक संगीतकारांनी गायकांना घडविले.
गीतकार शैलेंद्र सिंग, शकील बदायुनी, आझमी यांच्यासह अनेक नावाजलेल्यांचा उदय १९५० नंतर झाला. साहिर लुधियानी यांच्या आयुष्याचा प्रवास लाहोर ते दिल्ली व पुढे मुंबई असा झाला. या सर्वांनी संगीताला उच्चस्थानावर पोहचविले. म्हणूनच हिंदी चित्रपट गीतांचा गोडवा अवीट आणि अमीट आहे.

संगीतकारांचा ब्लॉक अन् लतादीदींची चाल
बरेचदा संगीतकारांना ब्लॉक आलेला असतो. अशा वेळी गायकही स्वत:च्या कल्पकतेतून चाल सुचवितात आणि गीत अजरामर कसे होते, याचा किस्सा अंबरिश मिश्र यांनी ऐकविला. एकदा नौशाद आणि मदनमोहन यांना एका गीताला चाल लावायची होती. बराच प्रयत्न करूनही मनासारखी चाल लागेना. तेव्हा मनाचा हिय्या करून लता मंगेशकरांनी गीताचा कागद मागितला. काहीशा त्रोटकपणे नौशादांनी तो त्यांना दिला. सुमारे १५ मिनिटांनी लतादीदींनी नंद रागातील चाल सुचविली. ते गीत होते ‘तू जहां जहां जहां चलेगा’! नौशादांनी दिवसभर नोटेशन घातले आणि पुढे ते गीत अजरामर झाले.

Web Title: Ambarish Mishra Exposed Hindi Movie Lyrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.