Maharashtra Election 2019; उपराजधानीतील सगळ्या होम मिनिस्टर्स गुंतल्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:50 AM2019-10-16T10:50:59+5:302019-10-16T10:51:25+5:30

उमेदवाराच्या पत्नी सातत्याने पाठीशी प्रचार रॅली, सभांमध्येसुद्धा दिसतात. तर काही उमेदवारांच्या पत्नी, महिला मेळावे, हळदी-कुंकू कार्यक्रम, धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवत आहेत.

All home ministers in the Nagpur are involved in campaigning | Maharashtra Election 2019; उपराजधानीतील सगळ्या होम मिनिस्टर्स गुंतल्या प्रचारात

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील सगळ्या होम मिनिस्टर्स गुंतल्या प्रचारात

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह बहुतांश उमेदवारांच्या पत्नी व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीच्या यशात पत्नीचाही सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते. महिलांची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. चूल आणि मूल या संकल्पनेतून त्या आता बाहेर पडल्या आहेत. मोठ्या संख्येने आज निवडणुकीच्या रिंंगणात पुरुषांना टक्कर देत आहेत. जे पुरुष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकले आहेत, त्यांच्या पत्नी खांद्याला खांदा लावत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. यात मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह बहुतांश उमेदवाराच्या पत्नी आपल्या पतीचा जनसंपर्क वाढवत आहेत. खऱ्या अर्थाने जो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा असतो, त्याचे अख्खे कुटुंब प्रचारात व्यस्त असते. उमेदवाराच्या सकाळच्या प्रचार यात्रा, सायंकाळच्या बैठका, दिवसभरातील जनसंपर्क यात उमेदवार व्यस्त असतो. निवडणुकीच्या काळात घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. कार्यकर्त्यांचा चहा-नाश्ता, जेवण याकडे घरच्या स्त्रीचे लक्ष असते; सोबतच त्या या व्यस्ततेतून वेळ काढून नवºयासाठी प्रचार करीत आहेत. काही उमेदवाराच्या पत्नी सातत्याने पाठीशी प्रचार रॅली, सभांमध्येसुद्धा दिसतात. तर काही उमेदवारांच्या पत्नी, महिला मेळावे, हळदी-कुंकू कार्यक्रम, धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवत आहेत. सध्या प्रचारात कशा व्यस्त आहेत उमेदवारांच्या पत्नी...त्यांच्याच शब्दात.

प्रचाराची गरज नाही, पण जबाबदारी आहे
खरे तर मुख्यमंत्र्यांचा प्रचार करणे मला गरजेचे नाही. कारण आमचे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी मेहनत घेत आहेत. आमची सर्व मंडळी मेहनत घेत असताना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी पण प्रचारात उतरली आहे. फार नाही, पण महिलांचे मेळावे, हळदी-कुंकूचे कार्यक्रम मी नियमित घेत आहे. महिला कार्यकर्त्यांनी जिथे-जिथे मला बोलावले तिथे तिथे मी जात आहे. कुठे कुठे भाषणही देत आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी माझ्या सुरू आहेत. विशेष करून महिलांवर मी फोकस केला आहे. खरे म्हणजे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे माझी नैतिक जबाबदारी आहे.
- अमृता देवेंद्र फडणवीस

घरोघरी प्रचार, पदयात्रांवर भर
मी पती विकास ठाकरे यांच्यासोबत प्रचार रॅलीमध्ये असते. पण मी स्वत:ही प्रचाराचे वेगळे नियोजन केले आहे. हे जसे सकाळपासून घराबाहेर पडतात, तशी मी सुद्धा काँग्रेसच्या महिला पदाधिकारी माझ्या मैत्रिणी यांच्यासोबत घराबाहेर पडून घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. माझा प्रचाराचा फोकस हा फक्त महिलांवर आहे. त्यांच्या छोट्या छोट्या बैठका, महिलांचे धार्मिक कार्यक्रम यावर जास्त लक्ष देत आहे. सायंकाळच्या सुमारास माझ्या मोहल्ला बैठका सुरू आहेत. यांच्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेत असताना, माझ्या परीने मी सुद्धा प्रचारात योगदान देत आहे.
-वृंदा विकास ठाकरे

आदल्या रात्रीच ठरतो प्रचार दौरा
खरं म्हणजे आमचे अख्खे कुटुंबच प्रचारात व्यस्त आहे. वर्षानुवर्षे घरात राजकारणाच्या गोष्टी होत असतात. मलाही त्या आता आत्मसात झाल्या आहे. त्यामुळे मी सुद्धा प्रचार सभा घ्यायला सुरूवात केली आहे. मी काही महिला कार्यकर्त्यांना घेऊन सकाळीच प्रचाराला निघते. त्यासाठी रात्रीच प्लॅनिंग झालेली असते. मी विशेष करून महिलांवर फोकस ठेवत आहे. महिला भजन मंडळ, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांच्या कॉर्नर सभा, बैठका घेऊन, मतदार संघात घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे.
- आरती अनिल देशमुख

घरचे सर्व सांभाळते आहे
माझीसुद्धा यांचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची इच्छा होती. पण दुर्दैवाने अपघात झाल्यामुळे माझ्या पाय फ्रॅक्चर आहे. त्यामुळे माझा नाईलाज झाला आहे. पण घरातील जबाबदारीही मोठी आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, येणाऱ्या-जाणाऱ्यांची सतत रेलचेल आहे. अशावेळी घराची जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि ती मी सांभाळत आहे.
- सुवर्णा सुधाकर देशमुख

घरातच थाटलेय प्रचार कार्यालय
आमचे घरच मुळात राजकारण, समाजकारणाचे केंद्र आहे. येणारे जाणारे, कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रमंडळी यांची सातत्याने रेलचेल असते. मी सुद्धा आता सर्व कामे बाजूला सारून प्रचाराच्या कामाला लागले आहे. घरातच आता महिलांच्या बैठका सुरू केल्या आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन युवकांशी संवाद साधत आहे. गावागावात छोटेमोठे कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा प्रचार सुरू आहे.
- वृंदा समीर मेघे


प्रचारासाठी माझा पूर्ण वेळ आहे
तशी तर मी वर्किंग वूमन आहे. पण हे निवडणुकीत उभे आहेत. आमच्या घरातील प्रत्येक जण त्यांच्या प्रचारात व्यस्त आहे. त्यामुळे माझी जबाबदारीसुद्धा आहे. मी तर पूर्ण वेळ यांच्या प्रचाराला दिला आहे. यांचा सकाळचा जसा प्रचाराचा शेड्यूल्ड असतो, तसा मीसुद्धा स्वत:चा तयार केला आहे. मी छोटेखानी महिला मेळावे, हळदी-कुंकूचे कार्यक्रम, महिला कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन माझा जनसंपर्क सुरू आहे. पहिल्यांदाच मी प्रचारात उतरले आहे. मजा येत आहे. उत्साह आहे.
- अनिता गिरीश पांडव

अख्खे कुटुंबच प्रचाराला लागले आहे
मी शिक्षण संस्थेची संचालिका आहे. पण निवडणुकीच्या काळात सध्या यांच्या प्रचारात नियमित कामाकडे दुर्लक्ष केले. खरे तर आमच्या संपूर्ण कुटुंबानेच यांच्या प्रचारासाठी नियोजन केले आहे. घरातील प्रत्येकाला प्रचाराची वेगवेगळी जबाबदारी दिली आहे. मी तर सकाळी ८ पासून रात्री १० पर्यंत सातत्याने प्रचारात व्यस्त आहे. प्रचार रॅलीमध्ये मीही यांच्यासोबत असतेच, पण मी घरोघरी जाऊन जनसंपर्कावर जास्त भर देते. माझा मुलगा अनुराग व अखिलेश यांना मी युवकांची जबाबदारी दिली आहे. एवढेच काय माझी सासूबाई किशोरीताई भोयर यासुद्धा आपल्यापरीने प्रचार करीत आहेत.
- अनुराधा सुरेश भोयर

प्रचार एकच लक्ष्य
मतदानाला फारच कमी दिवस उरले आहे. त्यामुळे सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दक्षिण नागपुरातील प्रत्येक भागात महिलांचा बैठका आणि मतदारांशी संपर्क साधण्यावर भर आहे. प्रमोद मानमोडे यांच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवित असून स्फूर्तीने मतदान करण्याचे आवाहन करीत आहे.
- निर्मला प्रमोद मानमोडे.

माझी जबाबदारी दुहेरी आहे
पती राजकारणात व्यस्त असले तरी, घरातील स्त्रीला दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते, आणि मी खरेच दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे. यांच्या प्रचारात फार व्यस्त नसली तरी, प्रचार रॅलीमध्ये मी सोबत राहत आहे. पण माझ्यावर घरातीलसुद्धा जबाबदारी आहे. घर सांभाळून त्यानंतर जो वेळ मिळतोय, त्यात मी प्रचाराचे काम करीत आहे.
- डॉ. आयुषी आशिष देशमुख

महिलांच्या कॉर्नर मिटिंगवर भर
आमचे संपूर्ण कुटुंबच डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारात लागले आहे. प्रत्येकाची जबाबदारी ठरवून देण्यात आलेली आहे. मुलगा कुणाल हा बूथचे काम सांभाळत आहे तर मुलगी दीक्षा ही पदयात्रा लहानलहान बैठकींवर भर देत आहे. माझ्याकडे सुद्धा लहानलहान कॉर्नर मिटिंग व पदयात्रांची जबाबदारी आहे. संपूर्ण मतदार संघात या बैठक करण्याासंदर्भात नियोजन केले असून या माध्यमातून सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार सुरु असतो. सकाळीच त्याचे नियोजन केले जाते.
- सुमेधा नितीन राऊत

स्वतंत्रपणे पदयात्रा व कॉर्नर मिटिंग
यांच्या प्रचारात मी स्वत: स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्यासोबत पदयात्रेत सामील होते. परंतु प्रत्येक ठिकाणी पोहोचणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मी स्वत: स्वतंत्रपणे पदयात्रा व कॉर्नर मिटिंग (लहान-लहान बैठका) विशेषत- महिलांशी संपर्क करीत असते. महिला मेळावे सुद्धा घेते. सकाळपासूनच त्याला सुरुवात होते. रात्रीच नियोजन केले जाते. सकाळपासून तर रात्रीपर्यंत हा प्रचार सुरु असतो.
- डॉ. सरिता मिलिंद माने

मी पण प्रचारात सक्रिय झाले आहे
तसे राजकारणातील मला फारसे कळत नाही. पण गेल्या काही वर्षात घरात एक राजकीय वातावरण सुरू झाले आहे. त्याच चर्चा, गप्पा, बैठका सातत्याने कानावर पडतात. गेल्या काही महिन्यांपासून हे सातत्याने यात व्यस्त आहे. आता तर उमेदवारीच मिळाली आहे. दररोजची यांची जी दमछाक होत आहे, ते बघून मी सुद्धा प्रचारात हातभार लावत आहे. महिला कार्यकर्त्या, मैत्रिणी, नातेवाईक यांच्या सहकार्याने महिलांच्या छोटेखानी बैठका, महिलांचे मेळावे घ्यायला लागले आहे. महिलांची प्रचार रॅली काढून घरोघरी पत्रक वाटणे, लोकांशी चर्चा करणे हे सर्व सुरू केले आहे. थोडा फार वेळ घरात देते, पण जास्तीत जास्त वेळ आता प्रचाराला देत आहे.
- सविता मोहन मते

 

Web Title: All home ministers in the Nagpur are involved in campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.