हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास कारवाई : दुग्धविकास मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:34 AM2020-04-01T00:34:30+5:302020-04-01T00:36:27+5:30

दूध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावातच शेतकऱ्यांंकडून दूध विकत घेण्यात यावे. हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांवर आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिला.

Action to buy milk at lower than guaranteed rate: Dairy Development Minister | हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास कारवाई : दुग्धविकास मंत्री

हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास कारवाई : दुग्धविकास मंत्री

Next
ठळक मुद्दे शासन हमीभावाने खरेदी करणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधात्मक कारवाईच्या काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होणाऱ्या दूध उत्पादनास मागणीच्या अभावाने अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी व कष्टकरी अडचणीत सापडला आहे. दूध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावातच शेतकऱ्यांंकडून दूध विकत घेण्यात यावे. हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांवर आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिला.
जिल्हा दूध उत्पादक संघाकडे शिल्लक राहिलेले शेतकऱ्यांचे दूध राज्य शासन खरेदी करणार असून, महानंदाच्या माध्यमातून राज्यात आवश्यक दुधाचा पुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यातील एकाही शेतकऱ्यांकडे दूध शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी शासन घेणार आहे. दुधापासून भुकटी बनविण्याचा कारखाना शासन सुरू करणार असून, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध शासन हमीभावाने खरेदी करेल, असे केदार यांनी सांगितले. दूध घेणाऱ्या खासगी सहकारी व शासकीय संस्थांना राज्य शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दूध, ब्रेड वाहतुकीवर बंदी नाही
 संचारबंदी काळात दूध, ब्रेड, अंडी, मांस या जीवनावश्यक बाबी असल्याने त्यांची वाहतूक व विक्री यांना प्रतिबंधक यादीतून वगळण्यात आलेले आहे. याविषयी काही अडचणी उद्भवल्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२८८५५११) किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन फरकाळे यांच्याशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३२०७०७०) संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Action to buy milk at lower than guaranteed rate: Dairy Development Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.