जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:23 AM2020-07-29T11:23:31+5:302020-07-29T11:24:05+5:30

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.

About 60% of the world's tigers in the country | जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांच्या अस्तित्वापुढे शिकारीचे संकट घोंगावत आहे. सन १९०० मध्ये जगात असलेले एक लाख वाघ आता फक्त ४,४०० शिल्ल्क राहिले आहेत. देशात २,९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ उरले आहेत. जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.

जगात वाघाच्या नऊ प्रजाती होत्या. त्यातील कॅस्पियन, जावनिय आणि बॅलिनिज या तीन प्रजाती नामशेष झाल्या आहेत. महाराष्ट्रात पश्चिमेकडील जंगलात वाघाचे प्रमाण बरेच घटले आहे. विदर्भात अधिक वाघ असून पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ही संख्या अधिक आहे.
वाघांच्या शिकारी, तुटत चाललेली अन्नसाखळी हे संख्या घटण्यामागील कारण सांगितले जाते. यासोबतच रस्ता अपघात, करंट लागल्याने होणारे मृत्यू, संघटित शिकारी टोळ्या, तस्करांकडून असणारे धोके ही सुद्धा कारणे सांगितली जातात.

भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना होते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली. तेव्हा देशात १,४११ वाघ होते, सन २०१० साली दुसरी गणना झाली तेव्हा १,७०६, सन २०१४ साली तिसरी गणना झाली तेव्हा देशात २,२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन २०१८ मधील चौथ्या गणनेत देशात २,९६७ वाघ झाले आहेत.

महाराष्ट्रही आघाडीवर
राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अंदाजपत्रानुसार देशात २,९६९ वाघांचा अधिवास आहे. या अहवालानुसार व्याघ्रसंवर्धनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, राज्यात ३१२ वाघ असल्याचे समोर आले. २०१४ साली राज्यात वाघांची संख्या १९० होती. ती आता ६४ टक्क्यांनी वाढली आहे.

व्याघ्रसंवर्धनात पहिली पाच राज्ये

राज्य                     सन-२०१४                        सन-२०१८                    स्थान
मध्य प्रदेश                ३०८                                 ५२६                        प्रथम

कर्नाटक                  ४०६                                ५२४                        द्वितीय
उत्तराखंड                ३४०                                ४४२                        तृतीय

महाराष्ट्र                  १९०                                 ३१२                         चतुर्थ
तामिळनाडू            २२९                                 २६४                        पाचवे


राज्यातील उत्तम चित्र हे संरक्षणात्मक आणि संघटनात्मक कामाचे फलित आहे. नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य वन विभागाच्या वतीने व्याघ्र संवर्धनासाठी निरनिराळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे.
- नितीन काकोडकर
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

Web Title: About 60% of the world's tigers in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ