नागपुरात ४०० रुग्णांची मूत्रपिंडासाठी जीवघेणी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 12:59 PM2022-06-27T12:59:54+5:302022-06-27T13:03:04+5:30

तीन महिन्यांपासून ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळणारे अवयवदानही ठप्प पडल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. डायलिसिसवर किती दिवस जगायचे? असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे.

About 400 patients with kidney failure in Nagpur division on dialysis | नागपुरात ४०० रुग्णांची मूत्रपिंडासाठी जीवघेणी प्रतीक्षा

नागपुरात ४०० रुग्णांची मूत्रपिंडासाठी जीवघेणी प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून अवयवदान ठप्प : डायलिसिसवर किती दिवस जगायचे?

सुमेध वाघमारे

नागपूर : किडनी निकामी झालेल्या नागपूर विभागातील तब्बल ४०० रुग्णांवर डायलिसिसवर जगण्याची वेळ आली आहे. यातच तीन महिन्यांपासून ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळणारे अवयवदानही ठप्प पडल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. डायलिसिसवर किती दिवस जगायचे? असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे.

अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. एक ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘मेंदू मृत’ व्यक्ती ११ जणांना जीवनदान देऊ शकतो, तर ३५ रुग्णांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो. परंतु उपराजधानीत योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी लढा देत आहेत. शहरात मेयो, मेडिकल, एम्स, लता मंगेशकर हॉस्पिटल या शासकीय रुग्णालयांसह ३०० वर मोठे खासगी हॉस्पिटल आहेत. परंतु आठवड्यातून एकही ‘ब्रेन डेड’ रुग्ण अवयवदानासाठी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. शेवटचे अवयवदान ३१ मार्च रोजी झाले. त्यानंतर अवयवदानाची प्रक्रियाच ठप्प पडली आहे.

- वर्षाला केवळ १० दात्यांकडून अवयवदान

२०१३ मध्ये नागपुरात ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ (झेडटीसीसी) स्थापन झाले. तेव्हापासून ते आपार्यंत केवळ ८९ ‘ब्रेन डेड’ व्यक्तींकडून अवयवदान झाले. यातून वर्षाला सरासरी केवळ १० अवयवदाते मिळत असल्याचे दिसून येते.

-९२ रुग्ण लिव्हरच्या प्रतीक्षेत

‘झेडटीसीसी’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात मूत्रपिंडासाठी (किडनी) ४००, यकृतासाठी (लिव्हर) ९२ तर, एक रुग्ण हृदय व फुफ्फुसाच्या प्रतीक्षेत आहे. यातील काही रुग्ण दीड ते दोन वर्षांपासून अवयवांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.

-जनजागृती पडतेय कमी

तज्ज्ञांनुसार, ‘ब्रेन डेड’ व्यक्तींकडून होणाऱ्या अवयवदानाबाबतची जनजागृती कमी, यातील गैरसमज व ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या कुटुंबाचे समुपदेशन करून अवयवदानाची माहिती देण्यासाठी रुग्णालयाचा पुढाकाराचा अभाव यामुळे अयवदान चळवळीला गती येत नसल्याचे वास्तव आहे.

-‘ब्रेन डेड’ रुग्णांच्या नातेवाइकांचा पुढाकार आवश्यक

रुग्णालयाच्या प्रत्येक आयसीयूमध्ये महिन्याकाठी ५ ते १० टक्के रुग्ण ‘ब्रेन डेड’ होतात. परंतु त्याचे निदान होत नाही किंवा त्याकडे लक्ष दिले जात नाही. दुसरे म्हणजे, डॉक्टरांनी अवयवदानासाठी समुपदेशन केले तरी बहुसंख्य नातेवाईक तयार होत नाहीत. यामुळे अवयवदानाची व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. विशेषत: डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केल्यावर नातेवाईकांनीच अवयवदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचे जीव वाचविणे शक्य होईल.

- डॉ. संजय कोलते, सचिव झेडटीसीसी, नागपूर विभाग

Web Title: About 400 patients with kidney failure in Nagpur division on dialysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.