नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची ५०० कोटीची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:00 AM2020-11-19T07:00:00+5:302020-11-19T07:00:19+5:30

Diwali Nagpur News दिवाळीच्या पाच दिवसात नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात जवळपास ५०० कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आहे.

500 crore turnover of electronics devices in Nagpur! | नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची ५०० कोटीची उलाढाल!

नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची ५०० कोटीची उलाढाल!

Next
ठळक मुद्देदिवाळीत पाच दिवसातच विक्रीएलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, मोबाईलची सर्वाधिक विक्री

मोरेश्वर मानापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळीच्या पाच दिवसात नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात जवळपास ५०० कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आहे. कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी आवडीच्या उत्पादनांची मनमुराद खरेदी केली. जास्त क्षमतेचे एलएडी, वॉशिंग मशीन, फ्रीज, होम थिएटर, लॅपटॉप, मोबाईलला सर्वाधिक मागणी होती.

दिवाळीत ग्राहक खरेदीसाठी येतील वा नाही, अशी भीती शोरूम संचालकांमध्ये पूर्वी होती. त्यामुळे बहुतांश संचालकांनी जास्त क्षमतेच्या अर्थात जास्त किमतीच्या उपकरणांचा स्टॉक केला नाही. पण दिवाळीत ग्राहकांची याच उपकरणांना मागणी आल्याने, त्यांना वेळेवर डिलिव्हरी देणे शक्य झाले नाही. पण एकंदरीत पाहता तब्बल सात महिन्यानंतर एवढ्या विक्रीमुळे दुकानदारांमध्ये उत्साह संचारला होता. पुढेही जास्त विक्रीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीत सर्वच नामांकित कंपन्यांच्या उपकरणांना मागणी होती. त्यामध्ये एलईडी, वॉशिंग मशीन, फ्रीज, होम थिएटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, मोबाईल, एसी आदींचा समावेश होता. यंदाच्या दिवाळीत ५५ आणि ६५ इंचीचे एलईडी, दोन दरवाजाचे मोठे फ्रीज, अद्ययावत वॉशिंग मशीन, स्मार्ट वॉच जास्त विकले गेले. मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून उत्पादनाचा पुरवठा कमी होता. त्यामुळे अनेकांनी बुकिंग केले आहे. कंपनीकडून माल आल्यानंतर त्यांना पुरवठा करण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

फायनान्सची विक्रीवाढीस भर

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विविध फायनान्स कंपन्यांची भर पडल्याने उपकरणांच्या विक्रीत अचानक वाढ झाली आहे. ९० टक्के ग्राहक फायनान्स करूनच उपकरणे खरेदी करतात. त्यामुळे नवनवीन कंपन्या बाजारात येत आहेत. याशिवाय काही कंपन्यांनी ठराविक रुपयाच्या फायनान्सवर गिफ्ट व्हाऊचरची योजना आणली होती. या योजनेतही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. फायनान्स कंपन्यांमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे भलं झाल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.

जास्त क्षमतेच्या उपकरणांची मागणी वाढणार

मोठ्या क्षमतेची उत्पादने ही आता प्रत्येकाच्या घराची गरज झाली आहे. याचा प्रत्यय यंदाच्या दिवाळीत आला. त्यामुळे विक्रेत्यांनीही या उत्पादनांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. या उत्पादनांची किंमत जास्त असतानाही वर्षभर फायनान्सचे हप्ते भरून ग्राहकांना ही किंमत कमीच वाटते. याच कारणाने यंदाच्या दिवाळीत शोरूममध्ये अशा उत्पादनांचा साठा संपला होता, असे विक्रेत्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीत उत्साही विक्री

यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री झाली. मध्यमवर्गीय कमी दिसले, पण उच्च मध्यमवर्गीयांनी सर्वाधिक खरेदी केली. विक्री होणार वा नाही, अशी भीती विक्रीच्या आकड्यांनी गेली. पुढेही विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.

श्रीकांत भांडारकर, व्यावसायिक.

विक्रीच्या उच्चांकाने गाडी रुळावर

काही महिन्यापासून मंदीत असलेला व्यवसाय दिवाळीत विक्रीच्या उच्चांकाने रुळावर आला आहे. अनेक महिने थांबलेल्या ग्राहकांनी सर्व प्रकारच्या उत्पादनांची मनसोक्त खरेदी केली. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला असून, पुढेही विक्री वाढेल.

बळीराम कांबळे, व्यावसायिक.

सर्व उपकरणांना मागणी

दिवाळीत सर्वच उपकरणांना मागणी होती. फायनान्सच्या आधारे ग्राहकांनी कुटुंबीयांसह मनमुराद खरेदी केली. एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीनसह अन्य वस्तूंची सर्वाधिक विक्री झाली. कोरोना मंदीनंतर दिवाळीत ग्राहकांसह विक्रेत्यांमध्ये उत्साह होता.

संदीप अग्रवाल, व्यावसायिक.

Web Title: 500 crore turnover of electronics devices in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी