पाेपटाची 'ती' १७ पिल्ले आता भरारी घेण्यासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:48 PM2021-03-01T12:48:38+5:302021-03-01T12:50:37+5:30

Nagpur News शिकाऱ्याच्या क्रूरतेमुळे पाेपटाच्या त्या पिल्लांना हवी असलेली आईच्या पंखांची ऊब हिरावली गेली. अशा वेळी हे नवजात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये दाखल झाली.

'That' 17 parrots are now ready to fly | पाेपटाची 'ती' १७ पिल्ले आता भरारी घेण्यासाठी सज्ज

पाेपटाची 'ती' १७ पिल्ले आता भरारी घेण्यासाठी सज्ज

Next
ठळक मुद्देअडीच महिन्यांपूर्वी शिकाऱ्याकडून केले हाेते मुक्त ट्रान्झिट सेंटरच्या आधाराने वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर : शिकाऱ्याच्या क्रूरतेमुळे पाेपटाच्या त्या पिल्लांना हवी असलेली आईच्या पंखांची ऊब हिरावली गेली. अशा वेळी हे नवजात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये दाखल झाले. यातले काही तर ७-८ दिवसांचेच हाेते. त्यांना आईची ऊब नाही, पण सेंटरच्या कर्मचाऱ्यांची माया जरूर मिळाली. पाहता-पाहता अडीच महिन्यांत ही पिल्ले माेठी झाली आणि आता तर आकाश भरारी घेण्यासाठी त्यांची तगमग चालली आहे. ट्रान्झिटच्या कुंदन हाते यांनी साेशल मीडियावर शेअर केलेली त्यांची हालचाल मन भरून येणारीच ठरली आहे.

नांदेडच्या वनविभागाने तस्करी होत असलेले पोपटांची ही पिल्ले १६ डिसेंबर, २०२० राेजी शिकाऱ्याकडून जप्त केली हाेती. न्यायालयाच्या निर्देशानुसार या नवजातांना पुढील देखभालीकरिता २१ डिसेंबर राेजी नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले. यातील ६ एकदमच नवजात आणि ११ थाेडी माेठी हाेती. त्यावेळी थंडीही वाढली हाेती. त्यामुळे या सर्व पिल्लांना मोठं करणे हे एक आव्हानच हाेते. मात्र, ट्रान्झिटचे डाॅ.बिलाल आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारले. त्यांना विशेष सेलमध्ये ठेवले. त्यांच्यासाठी तापमान नियंत्रित राहावं, म्हणून इनक्युबेटरची व्यवस्थाही केली आहे. त्यांची मुलांप्रमाणे देखरेख करण्यासाठी वेळाेवेळी लागणारे उपचारही केले गेले. स्वयंसेवक व डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली. पाहता-पाहता अडीच महिने लाेटले. या नवजात पिल्लांची आता पूर्ण वाढ झाली असून, ते आकाशात उडण्यासाठी सज्ज झाले आहेत. सेंटरकडून मिळत असलेल्या त्यांच्या आवडीच्या फळांची व पदार्थांची मेजवानी ते मनसाेक्त चाखत आहेत. विशेष म्हणजे, सतराही पिल्ले सुरक्षित असून, त्यातले एकही दगावले नाही. हे खराेखर ट्रान्झिटच्या स्वयंसेवकांचे माेठे यश आहे.

या पाेपटांना आणखी काही दिवस ट्रान्झिटमध्ये ठेवले जाणार आहे. किमान १५ दिवसांनंतर यांना निसर्गमुक्त केले जाइल, असा विश्वास कुंदन हाते यांनी व्यक्त केला.

Web Title: 'That' 17 parrots are now ready to fly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.