अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेन्ट’मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:39 AM2020-08-08T11:39:56+5:302020-08-08T11:41:32+5:30

अभियांत्रिकीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राकडून मागणी वाढत आहे. २०१५-१६ सालाच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेन्टची टक्केवारी वाढली असल्याचे चित्र आहे.

13% increase in placement of engineering students | अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेन्ट’मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेन्ट’मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

Next
ठळक मुद्देसात वर्षांतील चढता आलेखकोरोनाच्या सावटातदेखील ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हाती रोजगाराचे पत्र

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१० सालानंतर रोजगार मिळत नसल्याच्या कारणांमुळे अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये घट दिसून येत होती. मात्र मागील सहा वर्षांत स्थिती बरीच बदलताना दिसून येत आहे. अभियांत्रिकीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राकडून मागणी वाढत आहे. २०१५-१६ सालाच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेन्टची टक्केवारी वाढली असल्याचे चित्र आहे. सात वर्षांत आकडा १३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. कोरोनाच्या सावटातदेखील २०१९-२० मध्ये समाधानकारक आकडा दिसून आला हे विशेष.

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नसल्याची ओरड होती. २०१३-१४ साली राज्यभरात केवळ ३२.८२ टक्के विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्लेसमेन्ट झाले होते. त्यामुळे निराशेचेदेखील वातावरण होते. मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयांनी कात टाकली व विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढावे यावरदेखील भर दिला. शिवाय उद्योगक्षेत्रातूनदेखील मागणी वाढली.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आकडेवारीनुसार २०१३-१४ साली राज्यातील ३७३ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून ८९ हजार ५३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्यापैकी २९ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले होते. त्यानंतर लगेच रोजगार मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढत राहिला. मात्र टक्केवारी काही वर्षे थोडी घसरली होती. २०१८-१९ साली राज्यातील ३६३ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून १ लाख १३ हजार ६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नियमित तसेच बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश होता. त्यातील ४६ हजार ७२९ विद्यार्थ्यांना प्लेसमेन्ट मिळाले. २०१९-२० मध्ये महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही.

या विद्यार्थ्यांचे प्रवेश २०१५-१६ साली झाले होते व ती संख्या सुमारे ८८ हजार इतकी होती. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेला किती वाव असेल हेदेखील गुलदस्त्यात आहे. मात्र तरीदेखील आतापर्यंत राज्यभरातील ३५४ महाविद्यालयांतील ४३ हजार ७२५ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झालेले आहे.

शासकीय महाविद्यालयांतदेखील टक्केवारीत वाढ
राज्यात २०१३-१४ मध्ये १० शासकीय महाविद्यालये होती. त्यावर्षी तेथील ४२.२९ (१,६७८) टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले होते. २०१८-१९ मध्ये ही संख्या १५ वर गेली व ४३.२६ टक्के (१,६६९) विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू असताना किंवा संपल्यावर लगेच रोजगार मिळाला. २०१९-२० मध्ये १ हजार ५५९ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले.
 

 

Web Title: 13% increase in placement of engineering students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.