नागपूर जिल्ह्यातील ५१७८ पैकी १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 10:45 AM2021-06-10T10:45:07+5:302021-06-10T10:48:22+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्याच्या परिसरात लहानमोठे ५००० च्यावर उद्योग कार्यरत आहेत. यापैकी प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण न करणारे तब्बल १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत आले आहेत.

1229 out of 5178 industries in Nagpur district are in red category | नागपूर जिल्ह्यातील ५१७८ पैकी १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत

नागपूर जिल्ह्यातील ५१७८ पैकी १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत

googlenewsNext
ठळक मुद्देऑरेंज कॅटेगरीत २१५९ प्रदूषणविरहित मोठे व मध्यम उद्योग नगण्य

निशांत वानखेडे

नागपूर : राज्याची उपराजधानी व विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. मध्य भारतातील महत्त्वाचे शहर म्हणूनही नागपूरची औद्योगिक भरभराट होत आहे. मात्र यासोबत प्रदूषणातही वाढ झाली आहे. अपेक्षेप्रमाणे जिल्ह्याच्या परिसरात लहानमोठे ५००० च्यावर उद्योग कार्यरत आहेत. यापैकी प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण न करणारे तब्बल १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत आले आहेत. त्या खालोखाल स्तर कमी असला तरी प्रदूषणाच्या ऑरेंज कॅटेगरीत असलेल्यांमध्ये तब्बल २१५९ उद्योगांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नागपूर जिल्ह्यात असलेले तीन औष्णिक विद्युत प्रकल्प प्रदूषणाचे सर्वात मोठे घटक आहेत. १९८० मेगावॅट वीज निर्मिती करणारे सर्वात मोठे कोराडी विद्युत निर्मिती केंद्र ५ किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. दसरे खापरखेडा विद्युत केंद्रात १३४० मेगावॅट वीज निर्माण केली जाते व तिसरे ४२० मेगावॅटचे कोराडी थर्मल पॉवर प्लॅन्ट. महत्त्वाचे म्हणजे ही तिन्ही केंद्र कोळशावर आधारीत असल्याने मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुळीमुळे वायुप्रदूषणाचे कारण ठरले आहे. शिवाय परिसरात जलप्रदूषणही होत आहे. याशिवाय डब्ल्यूसीएलच्या ५ खुल्या व ३ भूमिगत कोळसा खाणी, मॉईलच्या ३ खुल्या व एक भूमिगत खाण आहेत. कळमेश्वरचे स्टील प्लॅन्ट आहे. याशिवाय सावनेर-कळमेश्वर-काटोल-पारशिवनी परिसरात एमआयडीसी, बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारले गेले आहे. यासोबतच मद्यनिर्मिती कारखाने, रासायनिक कंपन्या, स्टील, सिमेंट आदींचे कारखानेही याच प्रमाणात आहेत.

ग्रीन कॅटेगरीत नगण्य उद्योग

प्रदूषणाची पातळी अत्यल्प असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात नगण्यच म्हणावी लागेल. बुटीबोरी, एमआयडीसी भागात ग्रीन कॅटेगरीत एकही मोठा उद्योग नाही तर मध्यम उद्योग ३ आहेत. सावनेर, कळमेश्वर, काटोल भागात मोठे ४ व मध्यम ४ उद्योग ग्रीनमध्ये येतात. दोन्ही भागात अनुक्रमे ९८१ व ११७७ लघुउद्योगांचा समावेश आहे.

२३३ पर्यंत गेलेले वायुप्रदूषण, जलप्रदूषणातही वाढ

२०१८-१९ साली हिंगणा एमआयडीसी मॉनिटर स्टेशनवरून सर्वेक्षणानुसार प्रदूषणाचा स्तर सरासरी ‘२३३ मायक्रोग्रॅम/मीटरक्युब’वर गेलेला आहे. ९० ते १०० च्या मर्यादेपर्यंत तो समाधानकारक मानला जातो. यामध्ये ४४८ मायक्रोग्रॅ/मी.क्युब एसपीएम व २८३ मायक्रोग्रॅम/मी.क्युब आरएसपीएमची नोंद करण्यात आली आहे. कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाजवळ प्रदूषणाने धोक्याची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे. जलप्रदूषणाची पातळीही वाढली आहे. एमआयडीसी हिंगणा मधील उद्योगातून निघणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे नाग नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे.

पीक धोक्यात, कॅन्सरसारखे आजार

पर्यावरण तज्ज्ञ शरद पालिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोराडी व खापरखेडा वीज केंद्राच्या आसपास शेकडो एकर परिसरातील पीक संकटात आहे. पिकांची उत्पादकता घटली असून झाडांचाही ऊर्जानिर्मितीवर परिणाम झाला आहेत. मानवी आरोग्यावर भीषण परिणाम होत आहेत. वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुलीकणांमुळे त्वचा कॅन्सर, लंग्ज कॅन्सरसारखे आजार बळावत चालले आहेत. श्वसनाचे आजारही या भागात बळावले आहेत. उद्योगांवर नियंत्रण ठेवता येते पण औष्णिक वीज केंद्रांना अभय दिले जात असल्याची टीका पालिवाल यांनी केली.

कोरोनामुळे बरेचसे कारखाने बंद आहेत किंवा आहेत ते कमी क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे यावर्षी प्रदूषणाची पातळी खाली आली आहे. मात्र ज्या उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणाच्या अटी व शर्थीचे पालन केले नाही त्यांना नोटीस बजावली आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत वातावरणाची गुणवत्ता चांगली होत आहे.

- आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

कारखाने व उद्योगांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणता येते. मात्र नागरी प्रदूषणाला आळा घालणे कठीण आहे. घरातून निघणारे सांडपाणी, रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहेत. नागपूर शहरात उद्योगांपेक्षा तीच मोठी समस्या आहे. त्यामुळे एकूणच प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे.

- हेमा देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी, नागपूर

Web Title: 1229 out of 5178 industries in Nagpur district are in red category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.