‘टायगर कॅपिटल’मध्ये १० हजारावर ‘मोर’; राष्ट्रीय पक्ष्याला भावले नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:23 AM2020-08-31T10:23:35+5:302020-08-31T10:24:10+5:30

अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे.

10,000 peacocks in Tiger Capital; National bird likes the Nagpur l | ‘टायगर कॅपिटल’मध्ये १० हजारावर ‘मोर’; राष्ट्रीय पक्ष्याला भावले नागपूर

‘टायगर कॅपिटल’मध्ये १० हजारावर ‘मोर’; राष्ट्रीय पक्ष्याला भावले नागपूर

Next
ठळक मुद्देसर्वेक्षण, संवर्धनाची गरज

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच...’ बालपणी आवडणाऱ्या या कवितेतील आंब्याचे वन आता दिसणार नाही पण पिसारा फुलवून नाचत कुणाचेही लक्ष वेधणाऱ्या मोरांची संख्या मात्र नागपूर शहरात वाढली आहे. होय, अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे.

नागपूरकरांसाठी ही आनंददायक आणि अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल. शहर आणि आसपासचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अशातच गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांच्या संवर्धनाबत केलेले उपाय आणि वाढलेली जागृती महत्त्वाची ठरली असून अनेक प्राण्यांसाठी ही स्थिती पोषक ठरली आहे. तसे मोरांसाठीही हा परिसर पोषक ठरला आहे.

पक्षिप्रेमी संस्थांच्या पहाणीनुसार नागपूर शहर आणि परिसरात मोरांचे अस्तित्व दिसून येत असून ही संख्या १० हजाराच्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मानद वन्यजीव संरक्षक व महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे. अंबाझरी परिसरात ७५० हेक्टरमध्ये २००० हजाराच्या जवळपास मोर आहेत. तसेच गोरेवाडा वन परिसरात २०००, राजभवन व सेमिनरी हिल्स भागात ५००+, नारा नारी भागात ३००-३५०, अमरावती रोडवर कृषी विद्यापीठाच्या परिसर, दिघोरी, पारडी, व्हीएनआयटी, सोनेगाव, सोमलवाडा, मिहान अशा सर्व भागात मोरांचे अस्तित्व आहे.

सर्वेक्षण झाले तर संवर्धन होईल
शहराच्या परिसरात मोठ्या संख्येने मोर आहेत पण त्याचे योग्य सर्वेक्षण होण्याची गरज आहे. वनविभाग, विविध एजन्सी व एनजीओ यांच्या मदतीने सर्वेक्षण झाले तर राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याचे संरक्षण व संवर्धनास मदत होईल, असे मत कुंदन हाते यांनी व्यक्त केले.

पिकॉक डिस्ट्रिक्ट म्हणून मान्यता मिळावी
नागपूर शहराच्या कुठल्याही दिशेला गेल्यास मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येते. लॉकडाऊनच्या काळात हे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले, हे विशेष. याबाबत बर्डस ऑफ विदर्भ या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. राज्यातील कोणत्याही शहराच्या परिसरात एवढ्या मोठ्या संख्येत मोर नाहीत. त्यामुळे शहराला पिकॉक सिटी म्हणून ओळख मिळावी म्हणून आम्ही प्रस्ताव तयार करीत आहोत.
- अविनाश लोंढे,
पक्षी अभ्यासक

Web Title: 10,000 peacocks in Tiger Capital; National bird likes the Nagpur l

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.