राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 07:03 IST2025-12-07T07:02:27+5:302025-12-07T07:03:56+5:30
तीन वर्षांपूर्वी पालिकेने यासाठी काढलेली निविदा खर्चीक आणि वाढीव दराने असल्याचा आरोप झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, राणीबागेत या ‘एक्झॉटिक झोन’ला नव्याने गती मिळणार आहे.

राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) येत्या काळात ईमू, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा, जिराफ असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत. पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी १७ प्रदर्शिनी (पिंजरे) बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठीही पालिका नियोजन करीत आहे.
तीन वर्षांपूर्वी पालिकेने यासाठी काढलेली निविदा खर्चीक आणि वाढीव दराने असल्याचा आरोप झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, राणीबागेत या ‘एक्झॉटिक झोन’ला नव्याने गती मिळणार आहे.
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
मफतलाल मिलचा भूखंड राणीबागेलगत असून, तो पालिकेच्या ताब्यात आला आहे. या १० एकर भूखंडावर राणीबागेचा विस्तार केला जाणार आहे. विस्तारीकरणाच्या पुढच्या टप्प्यात एक्झॉटिक झोन उभारला जात असून, जगाच्या विविध खंडांतील १७ दुर्मीळ प्राणी अधिवास या अंतर्गत उभारले जाणार आहेत. प्राणी प्रदर्शनासाठी पायाभूत सुविधा, प्राण्यांसाठी स्वतंत्र वस्ती, भोजन, आरोग्य सुविधा तसेच पर्यटकांसाठी आधुनिक प्रदर्शनी व्यवस्था यांचा समावेश करण्यात येणार आहे. प्राण्यांच्या जैविक वर्तनाशी अनुरूप संरचना व नैसर्गिक अधिवासाप्रमाणे वातावरण निर्माण करण्यावर प्रकल्पाचा भर आहे.
पर्यटकांची बडदास्त
एक्झॉटिक झोनमध्ये दोन मजली ‘चीता थीम रेस्टॉरंट’, सार्वजनिक शौचालये, भेट देणाऱ्यांसाठी निवारा, इलेक्ट्रिक सब-स्टेशन, बोर्डवॉक, पदपथ, कम्पाउंड वॉल आणि विस्तृत लँडस्केपिंग उभारण्यात येणार आहे.
शिवाय हा झोन शैक्षणिक आणि मनोरंजक अनुभव देणाराही असेल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
काेणकाेणते प्राणी मिळणार बघायला?
एक्झॉटिक झोनमध्ये आणल्या जाणाऱ्या परदेशी पाहुण्यांमध्ये ईमू, वॉलेबी, ब्लॅक स्वान, लोरिकीट, कासव, जॅग्वार, चिंपांझी, प्यूमा, गोरिला, टॅमरिन, मार्मोसेट, पांढरे सिंह, आफ्रिकन सवाना (जिराफ-झेब्रा-ओरिक्स), जायंट अँटीटर, मीरकॅट, रिंग-टेल्ड लेमुर, चीता आणि हिप्पो यासारख्या प्रजातींचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील प्राणी संस्कृतीच्या थीमवर आधारित विभाग, पक्ष्यांशी थेट संपर्क करता येईल असे आवार, तसेच माकडांसाठी ‘जिमनेजियम’ स्वरूपाचे प्रदर्शन असून ते वैशिष्ट्यपूर्ण असेल असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय प्राणी पाहताना पर्यटकांना खराखुरा अनुभव यावा म्हणून काही प्रदर्शनांमध्ये जलाशय, कृत्रिम खडक, नैसर्गिक अडथळे यांचा वापर केला जाईल. तर काही ठिकाणी पाण्याखालूनही प्राण्यांचे निरीक्षण करण्याची सुविधा देण्याचा
प्रस्ताव आहे.